Headlines

अमरावती जिल्ह्यातील 848 गावांना पाणीटंचाईचा अंदाज:प्रशासनाचा 31 कोटी 50 लाखांचा आराखडा; 1795 उपाययोजना राबवणार




अमरावती जिल्ह्यातील २०१२ गावांपैकी ९४८ गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. यासाठी जिल्हा प्रशासनाने ३१ कोटी ५० लाख ७५ हजार रुपयांचा आराखडा तयार केला आहे. त्यातून १७९५ उपाययोजना राबवल्या जाणार आहेत. यंदा अल निनोच्या प्रभावामुळे विदर्भात पाऊस अपुरा आणि अनियमित झाला. त्यामुळे भूजल पातळी खालावली असून, अनेक भागांतील विहिरी आणि बोअरवेल कोरड्या पडू लागल्या आहेत. प्रशासकीय सर्वेक्षणानुसार, ९४८ महसुली गावांमध्ये पाणीटंचाईचा अंदाज आहे. आराखड्यात तात्कालिक आणि दीर्घकालीन उपायांचा समावेश आहे. खाजगी विहिरींचे अधिग्रहण, विहिरींमधील गाळ काढणे, नळ पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती, हातपंप उभारणे आणि नवीन विंधन विहिरींचा समावेश आहे. काही भागांत तात्पुरत्या नळ योजनाही सुरू केल्या जाणार आहेत. प्रगतीपथावर असूनही अपूर्ण राहिलेल्या नळ योजनांची कामे लवकर पूर्ण करून पाणीपुरवठा सुरू करण्यावर प्रशासनाचा भर आहे. ज्या गावांत टंचाई अधिक आहे, तेथील कामांना प्राधान्य दिले जाणार आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. ग्रामपातळीवर पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता स्नेहा धावडे यांच्या माध्यमातून उपाययोजनांचा आराखडा तयार करण्यात आला. आराखड्यातील उपाययोजना आणि खर्च (लाख रुपयांत): नळ योजनांची विशेष दुरुस्ती १७७१.५०, गाळ काढून विहीर खोल करणे ४७३.५०, खाजगी विहिरींचे अधिग्रहण ३८३.८५, हातपंप व वीजपंप २२८.४०, पाणीपुरवठा स्रोत बळकटीकरण १०८.५०, नवीन विंधन विहीर ७५.५०, तात्पुरती पूरक नळ योजना ५७.५० आणि टँकरद्वारे पाणीपुरवठा ५२.००.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *