![]()
पुणे पोलिसांकडून शहरात कलम 144 लागू करण्याच्या निर्णयावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकार आणि पुणे पोलिसांवर सडकून टीका केली आहे. पुण्यात आयोजित एका पत्रकार परिषदेत त्यांनी एमपीएससी (MPSC) पेपरफुटी, विद्यार्थ्यांचे आंदोलन, शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या धमक्या आणि राजकीय नेत्यांच्या संशयास्पद मृत्यूंबाबत मोठे दावे करत सरकारला धारेवर धरले. कलम 144 ची गरज काय? पुण्यात अचानक कलम 144 लागू करण्याच्या पोलीस आयुक्तांच्या (CP) निर्णयावर रोहित पवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “स्वातंत्र्यापूर्वी भारतीयांच्या आंदोलनांना दाबण्यासाठी ब्रिटिश सरकार हे कलम लावत असे. आता पुण्यात हे लागू करण्याचे कारण काय? विद्यार्थी संघटित होऊन स्वतःच्या हक्कासाठी लढत आहेत, म्हणून सरकार घाबरले आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “काही दिवसांपूर्वी भाजपच्या राजकीय नेत्याचा कार्यक्रम पुण्यात झाला, तिथे मोठी गर्दी होती, तेव्हा कारवाई का झाली नाही? मुख्यमंत्री भाजपच्या कार्यक्रमाला आले तेव्हा कारवाई केली का? पण विद्यार्थ्यांसाठी बसलेल्या शिक्षकांवर कारवाई का केली जातेय?” अशी प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली. कोयता गँगला आवरा, शिक्षकांना धमक्या देऊ नका पुण्याचे पोलीस आयुक्त विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी आलेल्या शिक्षकांना ‘तुमचा जीएसटी (GST) भरला का बघतो, तुमच्या इमारतीचे ऑडिट करतो’ अशा धमक्या देत असल्याचा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला. “सीपी साहेबांचे काम जीएसटी बघण्याचे नसून पुण्यात दहशत माजवणारी ‘कोयता गँग’ आणि खराब दारूमुळे जाणारे बळी रोखणे हे आहे. त्यांनी हवेतल्या गप्पा मारणे आणि धमक्या देणे थांबवावे,” असा इशारा पवार यांनी दिला. तसेच, विद्यार्थ्यांनी पुण्यात अमरावतीपेक्षा पाच पट मोठा मोर्चा काढण्याचा निर्धार केला असून, परवानगी दिली नाही तरी हा मोर्चा निघणारच, असेही त्यांनी स्पष्ट केले. MPSC अध्यक्षांना हटवा, स्वच्छ अधिकारी आणा एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरून त्यांनी आयोगाच्या कार्यपद्धतीवर आणि अधिकाऱ्यांवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले. “एमपीएससीमध्ये सध्या भ्रष्टाचार बोकाळला असून अनेक अधिकारी 8-10 वर्षांपासून ठाण मांडून बसले आहेत. पेपर तपासण्यात मोठे घोळ होत आहेत. चुकीची उत्तरे लिहिणाऱ्यांना पूर्ण गुण आणि योग्य उत्तरे देणाऱ्यांना शून्य गुण दिले जात आहेत. त्यामुळे आयोगाचे अध्यक्ष आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना तातडीने हटवून तुकाराम मुंढे यांच्यासारखा स्वच्छ प्रतिमेचा अधिकारी तिथे नेमावा,” अशी मागणी त्यांनी केली. तसेच, पेपर फुटल्याचे कारण पुढे करत सरकारने ‘ऑनलाईन’ परीक्षेचा घाट घालू नये, परीक्षा ‘ऑफलाईन’ आणि पारदर्शकच झाली पाहिजे, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या मृत्यूवर शंका संजय राऊत यांनी तुरुंगातून आल्यानंतर केलेल्या ‘स्लो पॉयझनिंग’च्या दाव्यावर बोलताना रोहित पवार यांनी एक खळबळजनक वक्तव्य केले. “या देशात काहीही होऊ शकते. केवळ संजय राऊतच नाही, तर 2014 मध्ये भाजपला सत्तेत आणण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे सुषमा स्वराज, अरुण जेटली आणि मनोहर पर्रीकर यांसारखे मोठे नेते सत्तेत आल्यानंतर अचानक आजारी पडून कसे मरण पावले? याबद्दल अनेक लोक दबक्या आवाजात शंका व्यक्त करत आहेत,” असे ते म्हणाले. यासोबतच, अजित पवार यांच्या गाडीच्या अपघातामागेही घातपात होता का, अशी शंका जनतेच्या मनात असल्याचे ते म्हणाले. दिशा सालियन आणि गरब्यावरूनही निशाणा दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यावर होणाऱ्या आरोपांवर बोलताना त्यांनी न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचे सांगितले आणि सीबीआय तपासातून सत्य बाहेर येईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच, नवरात्रीत गरब्यात प्रवेश देताना ओळखपत्र तपासण्याच्या विश्व हिंदू परिषदेच्या (VHP) नियमावलीवरही त्यांनी जोरदार टीका केली. “गरब्यात कुणाला येऊ द्यायचे यावर बोलण्यापेक्षा अयोध्येतील राम मंदिर उभारणीत आणि कुंभमेळ्याच्या विकास आराखड्यात झालेल्या भ्रष्टाचारावर अगोदर बोला,” असे आव्हान त्यांनी दिले. सर्व जाती-धर्माच्या लोकांनी एकमेकांच्या सणांमध्ये सहभागी होण्याची परंपरा राजकीय स्वार्थासाठी मोडू नये, असेही ते म्हणाले. हेही वाचा… मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 8 वा दिवस: उपचार अन् पाणी त्यागल्याने प्रकृती खालावली; आंतरवली सराटीत आंदोलकांची प्रचंड गर्दी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. राज्यभरातून हजारो मराठा आंदोलक उपोषणस्थळी दाखल झाले असून आंतरवाली सराटीमध्ये मोठी गर्दी जमली आहे. दरम्यान, जरांगे पाटील यांनी काल रात्रीपासून वैद्यकीय उपचार, सलाईन आणि पाणी घेण्यास पुन्हा नकार दिल्याने त्यांच्या प्रकृतीबाबत आंदोलकांची चिंता अधिक वाढली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
पुण्यात कलम 144 कशासाठी?:विद्यार्थ्यांच्या मोर्चाला घाबरताय का?; रोहित पवारांचा सरकारला आणि पुणे पोलिसांना खडा सवाल