![]()
कळमनुरी तालुक्यातील जामगव्हाण शिवारामध्ये रविवारी ता 6 सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. मृतदेहाचा एक हात तोडलेला असून पायाला देखील कुरतडलेले आहे. सदर व्यक्तीचा खून झाला असावा अशी शक्यता आखाडा बाळापूर पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळमनुरी तालुक्यातील जामगव्हाण शिवारामध्ये रस्त्यालगत एका व्यक्तीचा मृतदेह पडला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शरद मरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद बनसोडे, जमादार संतोष नागरगोजे, गायकवाड, परमेश्वर सरकटे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता मृतदेहाचा एक हात तोडलेल्या अवस्थेत दिसून आला. याशिवाय मृतदेहाचे पाय कुरतडलेल्या अवस्थेत दिसून आले आहे. सुमारे चार दिवसापूर्वीचा हा मृतदेह असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. दरम्यान घटनास्थळावरील परिस्थिती लक्षात घेता सदरील व्यक्तीचा खून करून जामगव्हाण शिवारात आणून टाकला असावा अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. मृतदेहाच्या शरीरावर काळ्या रंगाचा शर्ट असून पॅन्ट च्या ऐवजी बर्मुडा परिधान केले असल्याचे दिसून आले आहे. पोलिसांनी आता परिसरातील बेपत्ता व्यक्तीचा शोध सुरू केला असून त्यातून मृतदेहाची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मृतदेहाची ओळख पटल्यानंतरच मृत्यूचा नेमका प्रकार समोर येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. आखाडा बाळापूर पोलिसांनी पुढील तपास चालवला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Source link
कळमनुरी तालुक्यातील जामगव्हाण शिवारात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला:पोलिसांकडून ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू, हत्येची शक्यता