![]()
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाचे केंद्र बनलेल्या अंतरवाली सराटी येथे आता ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठीही आंदोलन सुरू झाले आहे. ओबीसी नेते मंगेश ससाणे यांनी रविवारी दुपारी 12 वाजता अंतरवाली सराटी येथील सोनिया नगर परिसरात लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केली. ओबीसींचे हक्क आणि आरक्षणाचे संरक्षण करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचे ससाणे यांनी सांगितले. उपोषणादरम्यान माध्यमांशी बोलताना मंगेश ससाणे यांनी राज्य सरकारच्या ओबीसी आरक्षणासंदर्भातील भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. “आमच्या हक्क-अधिकारांसाठी आम्ही हे उपोषण करत आहोत. आमचा जीव गेला तरी चालेल; आता बघू सरकारला फक्त मनोज जरांगे यांचेच ऐकायचे आहे की ओबीसींचेही ऐकायचे आहे,” असे ससाणे म्हणाले. सरकारकडून मराठा आरक्षणाच्या मागणीसंदर्भात विविध जीआर आणि नोंदींच्या आधारे प्रक्रिया राबवली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. मात्र, ओबीसी समाजातील भटक्या-विमुक्त आणि इतर वंचित घटकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचे ससाणे यांनी म्हटले. भटक्या-विमुक्तांसाठी वंशावळ जुळवणारी समिती का नाही? मंगेश ससाणे म्हणाले की, ओबीसी समाजातील भटका विमुक्त, कैकाडी, रामोशी, वडारी यांसारख्या समाजघटकांकडे आवश्यक कागदपत्रे आणि पुरावे नसल्याचा मुद्दा ससाणे यांनी उपस्थित केला. “आमच्या भटक्या समाजातील अनेकांकडे रहिवासाचे पुरावे नाहीत. त्यांच्याकडे ओळखपत्रेही नाहीत. अशा परिस्थितीत त्यांची वंशावळ कोण जुळवणार? त्यांच्यासाठी नोडल अधिकारी का नेमला जात नाही?” असा सवाल त्यांनी केला. सरकारने नुकतेच नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यासंदर्भात अधिसूचना काढल्याचा उल्लेख करत ससाणे यांनी ही संपूर्ण प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा आरोप केला. ओबीसी समाजातील वंचित घटकांसाठीही अशाच प्रकारची प्रशासकीय यंत्रणा उभारण्याची मागणी त्यांनी केली. ओबीसी आरक्षित पदांवर बोगस कुणबी प्रमाणपत्रांद्वारे घुसखोरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरही ससाणे यांनी गंभीर आरोप केले. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका यांसह स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षित पदांवर मोठ्या प्रमाणात बोगस कुणबी प्रमाणपत्रांच्या आधारे घुसखोरी झाल्याचा दावा त्यांनी केला. “महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षित पदांची श्वेतपत्रिका काढली, तर 80 ते 90 टक्के पदांवर बोगस कुणबी दाखले देऊन प्रस्थापित घरातील आमदार-खासदारांच्या नातेवाइकांनी घुसखोरी केल्याचे समोर येईल,” असा दावा ससाणे यांनी केला. कुणबी प्रमाणपत्रांच्या पडताळणीदरम्यान काही अर्ज फेटाळले गेल्यानंतर सरकारवर दबाव आणला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. “पडताळण्या फेटाळल्या गेल्यानंतर सरकारवर दबाव आणला जात आहे. हे चालणार नाही,” असे ते म्हणाले. ‘ओबीसींसाठीही मंत्रिमंडळ उपसमिती आहे, सरकारने आमचे म्हणणे ऐकावे’ मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी सरकारकडून मंत्रिमंडळ उपसमितीच्या माध्यमातून काम केले जात असल्याचा उल्लेख करत ओबीसींच्या प्रश्नांकडेही गांभीर्याने पाहण्याची मागणी ससाणे यांनी केली. “जशी मराठा मंत्रिमंडळ उपसमिती काम करते, तशी आमची ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती आहे. सरकारला आमच्या प्रश्नांशी काही देणे-घेणे आहे की नाही?” असा सवाल त्यांनी केला. फडणवीसांना थेट सवाल ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून ससाणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही थेट सवाल केला. “तुम्ही फक्त एका समाजाला अशी स्पेशल ट्रीटमेंट देता का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ओबीसी समाजाच्या संविधानिक हक्कांमध्ये घुसखोरी होत असल्याचा आरोप करत सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. “तुम्हाला उपोषणाचीच भाषा कळते. त्यामुळे आम्हीही आता इथे उपोषण सुरू करत आहोत. अख्खा महाराष्ट्र पाहत आहे की एका व्यक्तीच्या हट्टामुळे महाराष्ट्राला वेठीस धरले जात आहे,” अशी टीका ससाणे यांनी केली. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसोबतच आता अंतरवाली सराटीत ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठीही आंदोलन सुरू झाल्याने या आंदोलनाकडे राजकीय आणि सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सरकार या आंदोलनाची कशी दखल घेते आणि ओबीसी नेत्यांच्या मागण्यांवर काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. हेही वाचा.. देशात धर्माची झिंग:लोकांना धर्मांध करून मूळ प्रश्नांवरून लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न, महापुरुषांच्या रांगेत पंतप्रधानांचा फोटो नको, दुसरीकडे लावा- राज ठाकरे राज्यातील जनतेना वेगळ्या गोष्टीमध्ये गुंतवण्याचे काम सुरू आहे. देशात धर्मांची झिंग आली आहे, देवावरची श्रंद्धा, धर्माबद्दलचा अभिमान इतके आपण समजू शकतो पण माणसांनी धर्मांध असू नये. आपल्या धर्मांचा आपल्याला अभिमान असला पाहिजे, पण ज्या प्रकारे देशात वातावरण आहे ते तयार केले जात आहे, तुमच्यामध्ये राग निर्माण केला जात असून तुमचे लक्ष दुसरीकडे जाऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत,असे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटले आहे.सविस्तर वाचा..
Source link
अंतरवाली सराटीत ओबीसींचेही आंदोलन:आरक्षणाच्या मुद्द्यावर मंगेश ससाणे आक्रमक, ‘जीव गेला तरी चालेल’