![]()
श्रद्धेचा महासागर, भक्तीचा जागर आणि सामाजिक एकोप्याचा अनोखा संदेश देत भक्तिमय वातावरणात अकोला तालुक्यातील अतिशय प्राचीन देवस्थान असलेल्या श्री नागनाथ महाराज संस्थानचा वार्षिक यात्रा महोत्सव बुधवार, २ सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दिवसभरा
.
यात्रा महोत्सवानिमित्त पहाटेपासूनच संस्थानमध्ये धार्मिक विधींना सुरुवात झाली. परंपरेनुसार श्री नागनाथ महाराजांच्या समाधी स्थळाचे विधिवत पूजन, अभिषेक आणि ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर महाआरती पार पडली. समाधीच्या दर्शनासाठी सकाळपासूनच कुंभारी परिसरासह पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी रांगा लावल्या होत्या. दिवसभर मंदिर परिसरात भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली. दुपारी संस्थानच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. दरम्यान, श्री नागनाथ महाराज भजन मंडळाच्या भजनी कलाकारांनी सादर केलेल्या भक्तिगीतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. टाळ-मृदंगाच्या तालावर आणि हरिनामाच्या गजरात संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता.
यात्रेचे खास वैशिष्ट्य म्हणजे, गावातील सर्व समाजघटक आणि विविध धर्मांचे नागरिक यात सहभागी झाले होते. धार्मिक श्रद्धेसोबतच सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचे दर्शन या महोत्सवातून घडले. भाविकांना दर्शन सुलभ व्हावे आणि कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून गावातील युवक व स्वयंसेवकांनी चोख व्यवस्था ठेवली होती. या महोत्सवाने कुंभारीच्या समृद्ध वारकरी व सामाजिक एकोप्याची परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित केली.
सर्वधर्मसमभावाचा, एकतेचा देण्यात आला आदर्श संदेश नागनाथ महाराजांच्या यात्रेत सर्वधर्मीय बांधव दरवर्षी मोठ्या आपुलकीने सहभागी होतात. गावातील लकीबाई यांच्यासह इतर नागरिकही न चुकता यात्रेला हजेरी लावून सेवेत हातभार लावतात. यामुळे धार्मिक सलोखा व सामाजिक एकोप्याचे एक सुंदर चित्र कुंभारीत पाहायला मिळते.
एकोपा हीच ताकद गावात सामाजिक व धार्मिक एकोपा टिकवून ठेवण्याची परंपरा अनेक वर्षांपासून अविरत सुरू आहे. नागनाथ महाराजांच्या यात्रेच्या निमित्ताने जात-पात विसरून सर्व समाजघटक एकत्र येतात, हीच या महोत्सवाची खरी ताकद आणि ओळख आहे. – बाळासाहेब अतकरे, माजी सरपंच, कुंभारी.