![]()
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी, १४ एप्रिल रोजी येथील इर्विन चौक विविध कार्यक्रमांनी दणाणून गेला. सोमवारच्या मध्यरात्रीपासूनच मिरवणुका, पथनाट्य, स्वरांजली आणि महापुरुषांच्या जयघोषाचा गजर सुरू होता. दिवसभरात हजारो नागरिकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केले. गेल्या पंधरा वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्यीकरण समितीतर्फे या मुख्य सोहळ्याचे आयोजन केले जाते. या सोहळ्यांतर्गत सकाळच्या सत्रात ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत संजय आवटे यांचे व्याख्यान झाले. तसेच, दिवसभर शहराच्या विविध भागांतून छोट्या-मोठ्या मिरवणुका इर्विन चौकात पोहोचत होत्या. यावेळी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार बळवंतराव वानखडे होते. राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे, आमदार सुलभाताई खोडके व संजय खोडके, माजी पालकमंत्री हर्षवर्धन देशमुख, डॉ. सुनील देशमुख व ॲड. यशोमती ठाकूर, ज्येष्ठ पत्रकार ॲड. दिलीप एडतकर, प्राचार्य गोपीचंद मेश्राम, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय पदाधिकारी भय्या पवार, शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष गजानन पुंडकर आणि जिल्हाधिकारी आशिष येरेकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. स्मारक समितीचे समन्वयक किशोर बोरकर यांनी प्रास्ताविक केले, तर प्रा. डॉ. जगदीश गोवर्धन यांनी सूत्रसंचालन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला. या सोहळ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेले कार्य करणाऱ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव, जीवन संघर्ष, कर्तव्यपूर्ती व कर्तव्यदक्ष पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. याशिवाय, आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. बी. आर. देशमुख, उत्कृष्ट अधिकारी विजय शेंडे आणि स्तंभलेखक किशोर बनसोड यांना इतर पुरस्कार देण्यात आले. मराठा सेवा संघाने किशोर बोरकर यांचाही सत्कार केला. यावेळी बोलताना ज्येष्ठ व्याख्याते-पत्रकार संजय आवटे यांनी उपस्थितांना त्यांच्या भूमिका ओळखण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून व्यक्त व्हायला पाहिजे. सध्याचे युग हे डिजिटल युग आहे, त्यामुळे तुम्ही जे काही करता, ती माहिती कायमस्वरूपी जपली जाते. ही माहिती जेव्हा आताची पिढी वयात आल्यानंतर बघेल, तेव्हा त्यांना तुमच्याबद्दल वाईट वाटण्याऐवजी तुमचा अभिमान वाटेल, अशी परिस्थिती निर्माण करा.” आवटे यांनी पुढे म्हटले की, “राज्यकर्ते जेव्हा नोकरी, रोजगार, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची नाकाबंदी करत होते, नद्या, पर्वत, शासकीय उपक्रम विकत होते, तेव्हा तुम्ही काय करत होता, असा प्रश्न ही पिढी विचारेल.”
Source link
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अमरावतीत विविध कार्यक्रम:इर्विन चौकात पहाटेपासून रात्रीपर्यंत अनुयायांची अलोट गर्दी, मान्यवरांची उपस्थिती