![]()
अनेक दशके घनदाट जंगलात घालवल्यानंतर ऑक्टोबर २०२५ मध्ये आत्मसमर्पण केलेल्या ६१ नक्षलवाद्यांसाठी आयोजित करण्यात आलेली ‘महाराष्ट्र दर्शन’ सहल त्यांच्या आयुष्याला नवी दिशा देणारी ठरली आहे. या प्रवासादरम्यान या समूहाने बाहेरील जगातील विकास प्रत्यक्ष अनुभवला. विशेष म्हणजे, यातील ५५ आत्मसमर्पित नक्षलवाद्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच बाहेरील जगात पाऊल ठेवले होते. ज्यांनी आतापर्यंत रेल्वे फक्त बोर्डवरील चित्रांमध्ये पाहिली होती, त्यांनी बल्लारशा स्थानकावर जेव्हा प्रत्यक्ष ‘गंगा कावेरी एक्सप्रेस’ धावताना पाहिली, तेव्हा त्यांचे डोळे आश्चर्याने दीपून गेले. सीपीआय (माओवादी) केंद्रीय समितीचा ज्येष्ठ माजी नेता मल्लोजुला वेणुगोपाल राव उर्फ अभय, भूपती यांच्यासह मुख्य प्रवाहात आलेल्या या नक्षलवाद्यांच्या प्रवासादरम्यान सुरक्षेसह सर्वांच्या खाण्यापिण्याची उत्तम सोय करण्यात आली होती. सुरक्षा रक्षकांसह १०९ लोकांच्या ताफ्यासाठी दोन प्रवासी व्हॅन आणि एक विशेष किचन व्हॅन सोबत होती. या सहलीत दीक्षाभूमी, लोणार सरोवर, ऐतिहासिक अजंठा-वेरूळ लेणी, दौलताबादचा किल्ला, बीबी का मकबरा आणि वर्धा येथील सेवाग्राम आश्रम यांसारख्या प्रमुख ठिकाणांना आत्मसमर्पित नक्षलवाद्यांनी भेटी दिल्या. या प्रवासातील सर्वात खास आणि भावूक क्षण शेगावात अनुभवायला मिळाला. सहलीदरम्यान इतर सर्व ठिकाणी पोलीस विश्रामगृहात राहाण्याची व्यवस्था करण्यात आली होती, मात्र शेगावात या सर्वांची मुक्कामाची व्यवस्था थेट भक्त निवासात केली होती. शेगाव संस्थानातील अलौकिक स्वच्छता, चोख शिस्त आणि भक्तिपूर्ण वातावरण पाहून या माजी नक्षलवाद्यांच्या मनात अत्यंत आपुलकी आणि श्रद्धाभाव दाटून आला. तिथली स्वच्छता पाहून सर्वजण मनापासून भारावून गेले. नक्षलवादाची हिंसक वाट सोडून मुख्य प्रवाहात आलेल्या या आत्मसमर्पित नक्षलवाद्यांसाठी ही सहल नवीन आयुष्याची सकारात्मक सुरुवात ठरली आहे. हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरल्याने, आता आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची अशीच दुसरी ‘महाराष्ट्र दर्शन’ ट्रिप येत्या २६ जुलै रोजी रवाना होणार आहे.
Source link
आत्मसमर्पित नक्षलवाद्यांसाठी 'महाराष्ट्र दर्शन' सहल ठरली दिशादर्शक:55 जणांनी प्रथमच पाहिली रेल्वे; शेगावच्या स्वच्छतेने जिंकले मन