‘नीट’ (NEET) पेपरफुटीच्या निषेधार्थ आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीने (CJP) जंतरमंतर येथे पुकारलेल्या ‘संसद मार्च’ आंदोलनाला सोमवारी हिंसक वळण लागले. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या
.
नेमके काय घडले?
संसद मार्चदरम्यान परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचे सांगत पोलिसांनी जंतरमंतरवर लाठीचार्ज सुरू केला आणि आंदोलकांचे तंबू हटवले. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, सुमारे 15 ते 20 सुरक्षा कर्मचाऱ्यांनी (RAF) एका तरुणाला घेरले असून ते त्याला अमानुषपणे लाठ्यांनी मारत असल्याचे दिसत आहे. एवढी मारहाण होऊनही तो तरुण न डगमगता “मारो सर…” असे ओरडत पोलिसांच्या लाठ्या-काठ्या झेलत असल्याचे दिसते. अखेर हातात तिरंगा घेतलेल्या एका महिला पोलिसाने हस्तक्षेप करत त्याला तेथून बाजूला काढले.
या तरुणाचे नाव भरत बानाईत असून तो नागपूरचा रहिवासी आहे. भरत एम.कॉम. झालेला आहे. तो सीजेपीच्या (CJP) सुरुवातीच्या समर्थकांपैकी एक असून या आंदोलनासाठी तो नागपूरहून दिल्लीला गेला होता.
‘माझ्या शरीराच्या प्रत्येक इंचावर मार बसलाय’
डोक्यातून रक्त भळभळत असताना भरतने माध्यमांशी संवाद साधला. “माझ्या डोक्यावर आणि शरीराच्या प्रत्येक इंचावर मार बसला आहे. हे विद्यार्थ्यांचे आंदोलन असून त्यावर सरकारने केलेली कारवाई अत्यंत निषेधार्ह आहे. या देशात लोकशाही संपली असून आपली वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू आहे. आम्ही आतंकवादी नाही. मला आता अशा देशात जगण्यात अर्थ राहिलेला नाही. काठीने मारण्यापेक्षा मला थेट गोळीच घालून मारून टाका,” असा उद्विग्न सवाल भारतने उपस्थित केला. तसेच, “मी स्वतः हिंदू असूनही माझ्यावर असा हल्ला करण्यात आला,” असेही तो म्हणाला.
पोलिसांच्या कारवाईनंतर सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेला भारत म्हणाला, “20 जुलै हा माझ्या आयुष्यातील काळा दिवस राहील. हा त्रास मला नेहमीच या संघर्षाची आठवण करून देईल.”
आई-वडिलांचा सरकारवर संताप
भरतला झालेल्या अमानुष मारहाणीचा व्हिडिओ पाहून नागपुरात असलेले त्याचे आई-वडील अत्यंत व्यथित झाले. आई विनता बनाईत म्हणाल्या, “माझ्या मुलाला ज्या पद्धतीने पकडून-पकडून आणि दोन-दोन वेळा मारहाण करण्यात आली, ती अत्यंत चुकीची आहे. तो नागपुरातही अभिजीत दीपके यांच्या आंदोलनात सहभागी झाला होता. व्हिडिओ पाहून मला रडू कोसळले.”
वडिलांचा सरकारला जाब
“ही मुले आपल्या हक्कांसाठी लढत आहेत, ते कोणी आतंकवादी नाहीत. सरकारने कोणालाही अशी मारहाण करू नये. जर सरकारला कारवाई करणे शक्य नसेल तर तसे स्पष्ट सांगावे, पण अशा अमानुष पद्धतीने मुलांना मारहाण करणे चुकीचे आहे,” अशी भावना भरतच्या वडिलांनी व्यक्त केली आहे.
पोलिसांचे आवाहन आणि पुढील घडामोडी
लाठीचार्जच्या घटनेनंतर दिल्ली पोलिसांचे अतिरिक्त पोलीस आयुक्त राजीव रंजन यांनी आंदोलकांना शांतता आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, सीजेपीचे (CJP) नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांची भेट घेतली असून, त्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर पक्षांतर्गत चर्चा करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती सौरव दास यांनी ‘X’ (ट्विटर) वर दिली.
दिल्लीत आंदोलकांवर लाठीचार्ज
दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीचा संसद मार्च होता. आंदोलक संसदेजवळ पोहोचले. यावेळी भास्कर रिपोर्टर उदय भटनागर यांनाही लाठी लागली. त्यामुळे ते जखमी झाले. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्जसह अश्रुधुराचे गोळे फेकले. यात अनेक लोक जखमी झाले. दरम्यान, मोठ्या संख्येने आंदोलक राजीव चौक आणि मंडी हाऊस मेट्रो स्टेशनमध्ये घुसले. तेथे त्यांनी ‘इंकलाब जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. सोमवारच्या आंदोलनासाठी लोक रविवार रात्री 11 वाजल्यापासूनच जंतर-मंतरवर जमायला लागले होते. त्यांनी फुटपाथवरच रात्र काढली. सकाळी जेव्हा मोर्चा सुरू झाला, तेव्हा पोलीस आणि आंदोलकांमध्ये धक्काबुक्की झाली.
संसद मोर्चात दंगल केल्याप्रकरणी 5 जणांविरुद्ध गुन्हे दाखल
‘कॉकरोच जनता पार्टी’ने संसदेच्या दिशेने काढलेल्या मोर्चाच्या संदर्भात दिल्ली पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध पाच गुन्हे (FIR) दाखल केले आहेत. हे गुन्हे पार्लमेंट स्ट्रीट, बाराखंबा आणि कनॉट प्लेस पोलीस ठाण्यांमध्ये नोंदवण्यात आले आहेत. यामध्ये दंगल करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे आणि सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ला करणे यांसारख्या आरोपांचा समावेश आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेज आणि सोशल मीडियावरील पोस्ट्सच्या आधारे या हिंसाचारात सहभागी असलेल्यांची ओळख पटवत आहेत.
हेही वाचा…
HC चे वांगचुक यांना मेदांताला हलवण्याचे आदेश:गत 4 दिवसांपासून सफदरजंग रुग्णालयात होते दाखल; जंतरमंतरवर पोलिसांविरोधात नारे

दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयातून मेदांता रुग्णालयात हलवण्याचे आदेश दिले. त्यांच्यावरील उपचारासाठी मेदांता येथे डॉक्टरांचे एक पॅनल स्थापन करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिलेत. त्यांची पत्नी गीतांजली अंगमो यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना हा आदेश देण्यात आला. येथे वाचा संपूर्ण बातमी
शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी उद्या:CM देवेंद्र फडणवीस म्हणाले- NEET च्या फेसलेस आंदोलनात काही स्वार्थी लोक घुसले, त्यांना केवळ अराजकता तयार करायचीय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत शेतकरी कर्जमाफी, अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित प्रदर्शन आणि दिल्लीतील सुरू असलेल्या आंदोलनांवर भूमिका मांडली. उद्या शेतकरी कर्जमाफीची प्राथमिक यादी जाहीर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच, लोकशाहीत आंदोलनाचा अधिकार असला तरी हिंसा आणि अराजकता खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. येथे वाचा संपूर्ण बातमी
इंडिया आघाडी आतंकवादासारखी परिस्थिती निर्माण करतेय:दिल्लीतील आतंकवाद्यांना लोकशाही मार्गाने उत्तर द्या, सदाभाऊ खोतांचे वादग्रस्त वक्तव्य

दिल्लीतील जंतर-मंतरवर नीट परीक्षा आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या आंदोलनावर सदाभाऊ खोत यांनी अत्यंत आक्रमक आणि वादग्रस्त भाष्य केले आहे. दिल्लीत आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची तुलना थेट ‘आतंकवाद्यांशी’ करत, “या आतंकवाद्यांना सरकारने लोकशाही मार्गाने सडेतोड उत्तर द्यावे,” असे आवाहन त्यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात संतापाची लाट उसळली असून एक नवा मोठा वाद पेटला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी