Headlines

जिल्हाधिकारी गौडांचे आवाहन: 'स्वच्छ वारी'चा संकल्प करा:वाळूज पंढरपूर आषाढी एकादशी यात्रेसाठी प्रशासनाची तयारी




आषाढी एकादशीनिमित्त वाळूज पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता आणि सुरक्षा उपाययोजनांना प्राधान्य देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे. यंदाची वारी ‘स्वच्छ वारी’ म्हणून साजरी करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी केले. यात्रोत्सवाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम., पोलीस उपआयुक्त पंकज अतुलकर, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक शिंदे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मारुती मस्के यांच्यासह मंदिर प्रशासन, ग्रामपंचायत, अन्न व औषध प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यात्रोत्सवादरम्यान भाविकांना फराळ वाटप करण्यासाठी १३ ठिकाणी स्टॉल्स उभारले जाणार आहेत. प्रत्येक स्टॉलवर स्वयंसेवक आणि कचरा संकलनासाठी कचराकुंड्या उपलब्ध असतील. भाविकांनी टाकलेला कचरा उचलण्यासाठी स्वच्छता स्वयंसेवक आणि सफाई कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाईल. तसेच, घंटागाड्या व कचरा संकलन करणाऱ्या वाहनांची व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. यात्रेतील गर्दी लक्षात घेता, ४ पाळ्यांमध्ये एकूण ३४२० स्वयंसेवकांची आवश्यकता असून, त्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्रसेना तसेच स्वयंसेवी नागरिकांनी सेवा देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यात्रा परिसर आणि मंदिरात एकूण ६५ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत, ज्याद्वारे पोलीस यंत्रणा यात्रेवर लक्ष ठेवेल. याशिवाय, एआय तंत्रज्ञानाचा वापर करून यात्रेकरूंची संख्या मोजली जाईल, अशी माहिती पोलीस उपआयुक्त पंकज अतुलकर यांनी दिली. जिल्हाधिकारी गौडा यांनी रहदारी व्यवस्थापन, प्रकाश व्यवस्था, वीज पुरवठा, स्वच्छता, अग्निशमन सेवा, अन्न नमुने तपासणी आणि आरोग्य पथके यांच्या उपलब्धतेबाबत निर्देश दिले. तसेच, आवश्यक पोलीस बळ पुरवण्याबाबतही सूचना देण्यात आल्या. यंदाची वारी ‘स्वच्छ वारी’ म्हणून यशस्वी करण्यासाठी सर्वांनी संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी पुन्हा केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *