![]()
पुणे शहरात पावसाळ्यात जड वाहने आणि मालवाहतूक करणारी वाहने अडकून वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी आणि जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ९ जुलैपासून पुढील आदेशापर्यंत जड-अवजड वाहनांना प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. या आदेशानुसार, जड आणि अवजड वाहनांनी पुणे शहरात प्रवेश न करता पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. हा निर्णय विशेषतः पावसाळ्यातील संभाव्य वाहतूक समस्या टाळण्यासाठी घेण्यात आला आहे. सोलापूरकडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी केडगाव-चौफुला-न्हावरे-तळेगाव ढमढेरे-शिक्रापूर-चाकण मार्ग किंवा उरळी कांचन-कोरेगाव मुल-अष्टापूर-तळेगाव ढमढेरे-शिक्रापूर-चाकण मार्ग वापरता येईल. मुंबई येथून सोलापूरकडे जाणाऱ्या वाहनांनी तळेगाव दाभाडे-चाकण-शिक्रापूर-तळेगाव ढमढेरे-न्हावरे-केडगाव-चौफुला सोलापूर महामार्ग किंवा तळेगाव दाभाडे-चाकण-शिक्रापूर-तळेगाव ढमढेरे-अष्टापूर-कोरेगाव मुल-उरळी कांचन मार्गाचा वापर करावा. तसेच, कात्रज मंतरवाडी फाटा-वडकी-दिवेघाट-सासवड-जेजुरी-मोरगाव-सुपे-केडगाव चौफुला मार्गानेही जाता येईल. मुंबई येथून अहिल्यानगरकडे जाणाऱ्या वाहनांनी तळेगाव, चाकण, खेड, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, अहिल्यानगर या मार्गाचा वापर करावा. अहिल्यानगर येथून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी शिक्रापूर-चाकण-तळेगाव मार्गाचा अवलंब करावा. सासवड येथून सोलापूरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी सासवड-जेजुरी-मोरगाव-सुपे-केडगाव-चौफुला हा मार्ग निश्चित करण्यात आला आहे. शहरात मालाची चढ-उतार करणाऱ्या वाहनांना रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत प्रवेश दिला जाईल. अहिल्यानगरकडून पुणे शहरात येणाऱ्या वाहनांनी नगर रोडने वाघोली-खराडी बायपास-शास्त्रीनगर चौक-गोल्फ क्लब चौक-आळंदी रोड जंक्शन-चंद्रमा चौक-पोल्ट्री चौक-हॅरीश ब्रिज मार्गे इच्छित स्थळी जावे. सोलापूरकडून पुणे शहरात ये-जा करण्यासाठी मगरपट्टा-भैरोबानाला-लुल्ला नगर चौक-गंगाधाम चौक-मार्केट यार्ड मार्गाचा वापर करावा. सातारा-सांगली-कोल्हापूरकडे जाणारी वाहने बेंगळुरू महामार्गमार्गे, नवले ब्रिज, कात्रज चौक, मार्केट यार्ड मार्गाचा वापर करतील. मुंबई-नाशिककडून पुणे शहरात येणारी वाहने हॅरिश ब्रिज-बोपोडी-चंद्रमा-गोल्फ चौक, मार्केट यार्ड मार्गाचा वापर करतील.
Source link
पुणे शहरात जड-अवजड वाहनांना प्रवेशबंदी लागू:पावसाळ्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय