Headlines

कैसा हराया डायलॉग गाजला, आता सहर शेख अडचणीत:बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणात नगरसेवकपद धोक्यात; चार यंत्रणांची दिशाभूल?




ठाणे महानगरपालिकेतील मुंब्रा परिसरातील प्रभाग क्रमांक 30 मधून निवडून आलेल्या एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांच्याविरोधात गंभीर आरोप समोर आले आहेत. निवडणूक लढवताना बनावट जात प्रमाणपत्र सादर करून त्यांनी शासकीय यंत्रणांची दिशाभूल केल्याची तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीमुळे सहर शेख यांच्या नगरसेवक पदावर गंडांतर येण्याची शक्यता निर्माण झाली असून, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. जानेवारी 2026 मध्ये झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत सहर शेख यांनी मुंब्रा भागातून विजय मिळवत राजकारणात दमदार एन्ट्री केली होती. कैसा हराया… हा त्यांचा डायलॉग राज्यभर चर्चेत आला होता. मात्र, आता त्याच सहर शेख यांच्यावर निवडणूक प्रक्रियेदरम्यान चार महत्त्वाच्या शासकीय यंत्रणांची दिशाभूल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, सहर शेख यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे जात प्रमाणपत्र मिळवले. त्यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून हे प्रमाणपत्र घेतल्याचे सांगितले जात आहे. यासाठी त्यांच्या वडिलांनी नमुना 8 चा वापर करून अधिकाऱ्यांची दिशाभूल केली, असा आरोप आहे. प्रत्यक्षात स्थलांतरितांसाठी नमुना 10 लागू असताना नमुना 8 वापरल्याने हा प्रकार संशयास्पद ठरतो. या प्रकरणात सिद्दीकी अहमद यांनी ठाणे उपविभागीय अधिकारी कार्यालयात तक्रार दाखल करून जात प्रमाणपत्राची पडताळणी करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार सुनावणी घेण्यात आली असता सहर शेख यांच्या कागदपत्रांमध्ये काही त्रुटी आढळल्याचे समोर आले आहे. 18 मार्च रोजीच्या सुनावणीला सहर शेख यांचे वडील अनुपस्थित राहिले, तर त्यांच्या वकिलांनी काही कागदपत्रे सादर केली. त्यानंतर 23 मार्च रोजी झालेल्या पुढील सुनावणीत तहसीलदारांनी प्रमाणपत्रातील त्रुटींवर बोट ठेवले. यासोबतच सहर शेख या ठाण्यातील रहिवासी असताना त्यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जात प्रमाणपत्र का घेतले, यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली असून, सखोल चौकशी सुरू आहे. मात्र, सहर शेख आणि त्यांच्या वडिलांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळालेला नाही. सहर शेख यांच्या राजकीय कारकिर्दीवर मोठे प्रश्नचिन्ह दरम्यान, सहर शेख या एमआयएमच्या नगरसेविका असून, त्यांनी निवडणुकीच्या काळात स्थानिक राजकारणात आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांनी आणि त्यांच्या वडिलांनी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली होती. आता या नव्या वादामुळे सहर शेख यांच्या राजकीय कारकिर्दीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *