Headlines

रुग्णांच्या सेवेसाठी मोफत "आरोग्यरथ' बस धावणार!:अकोले येथून आठवड्यातून तीन दिवस मोफत बससेवा, रुग्णांना मिळाला दिलासा‎




राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीदिनी (दि.२१) तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेचे एक दिलासादायक पाऊल उचलण्यात आले. धामणगाव (ता.इगतपुरी, जि.नाशिक) येथील एसएमबीटी रूग्णालय मदतीने अकोलेतून रूग्णांना उपचारार्थ घेऊन जाण्यास व उपचारानंतर परत येण्यास आठवड्यातून ३ दिवस बसस्थानकाबाहेर “आरोग्यरथ” ही खाजगी मोफत रुग्ण बससेवा सुरू करण्यात आली. या गरजेच्या व दिलासादायक उपक्रमांचे नागरिकांमधून स्वागत होत आहे. आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या हस्ते आरोग्यरथाचे पूजन करून या मोफत बससेवेचा शुभारंभ वसंतपुष्प हॉस्पिटल येथून करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे तालुकाध्यक्ष अक्षय आभाळे, डॉ. संदीप कडलग, हरिभाऊ फापाळे, प्रशांत बंदावणे, महिपाल देशमुख, दत्ता नवले, पराग वाडगे, अंकुश वैद्य आदी उपस्थित होते. शहर व तालुक्यातील रुग्णांसह नातेवाईकांच्या प्रवासाची अडचण लक्षात घेऊन ही सेवा सुरू करण्यात आली आहे. यामुळे अकोले तालुक्यातील रुग्णांना आर्थिक भार न पडता सुरक्षित आणि वेळेवर उपचारासाठी मोफत येजा करता येणार आहे. ही मोफत बससेवा आठवड्यातून मंगळवार, गुरुवार आणि शनिवारीच चालणार आहे. अकोले व्हाया राजूर ते एसएमबीटी असा १५० किलोमीटर परतीच्या प्रवासाचा मार्ग आहे. सकाळी ८ वाजता अकोले बसस्थानकात वसंतपुष्प हॉस्पिटलपासून ते एसएमबीटी हॉस्पिटल अशी बस असणार आहे. दुपारी ४ वाजता अकोलेत बस पोहोचेल. बसमध्ये आरामदायी बैठक व्यवस्था, शिस्तबद्ध वेळापत्रक आणि रुग्ण-केंद्रित सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आदिवासीबहुल दुर्गम अकोले तालुक्यातील अनेक अजारी गरजू रुग्णांना मोठ्या शहरात उपचारांसाठी जाणे आर्थिक दृष्टिकोनातून परवडत नाही. गरजू रूग्णांना उपचार करून पुन्हा घरी येण्यास ही मोफत आरोग्यरथ रुग्ण बस सेवा उपयोगी ठरेल. रूग्णांना पैसे खर्चून मोठ्या शहरात उपचारार्थ जाण्याचा होणारा त्रास कमी व्हावा, यासाठी हे प्रयत्न आहेत. रूग्ण व नागरिकांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार लहामटे यांनी केले. रुग्णांसाठी मोफत बससेवेचा शुभारंभ आ. किरण लहामटे यांच्या उपस्थितीत केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *