Headlines

शासकीय महाआरोग्य शिबिराचे भाजपच्या मेळाव्यात रूपांतर:सत्तेचा गैरवापर झाल्याचा विरोधकांचा आरोप




मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिरात नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी, विविध आजारांचे निदान, शस्त्रक्रिया आणि उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्याचा उद्देश होता. या शिबिरासाठी आरोग्य विभागातील अधिकारी, डॉक्टर आणि कर्मचारी मोठ्या प्रमाणात कार्यरत होते. मात्र, शासकीय कार्यक्रमाचे स्वरूप बाजूला पडून या शिबिरात भाजपच्या नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती दिसून आल्याने कार्यक्रमाचे रूपांतर पक्षीय मेळाव्यात झाल्याचे दिसून आले. पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या पुढाकारातून आयोजित या शिबिराच्या उद्घाटनासाठी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचा अधिकृत दौरा जाहीर करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्ष कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती ठळकपणे जाणवली. त्यांच्यासह भाजपचे विद्यमान आमदार, माजी आमदार, जिल्हाध्यक्ष, विविध पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित असल्याने संपूर्ण परिसर भाजपमय झाल्याचे चित्र दिसून आले. शासकीय निधी, शासकीय यंत्रणा आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात पक्षीय घोषणाबाजी, नेत्यांचे स्वागत आणि कार्यकर्त्यांची गर्दी यामुळे अनेक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. आरोग्य सेवा मिळविण्यासाठी आलेल्या रुग्णांना गर्दीचा फटका बसल्याचीही चर्चा होती. शासकीय कार्यक्रमात राजकीय शक्तिप्रदर्शन योग्य आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आरोग्य शिबिराचा मूळ उद्देश सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हा असताना, त्यावर राजकीय रंग चढल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. शासकीय कार्यक्रम आणि पक्षीय कार्यक्रम यांच्यातील सीमारेषा पाळली गेली का, याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकाराची प्रशासनाने दखल घेऊन भविष्यात शासकीय कार्यक्रमांची राजकीय व्यासपीठ म्हणून पुनरावृत्ती होणार नाही, यासाठी स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी विविध स्तरातून होत आहे. शिवरायांच्या महाराष्ट्रात राज्य शिष्टाचाराचा अपमान वर्धाचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव डॉ. अभ्युदय मेघे म्हणाले, महाराष्ट्र म्हणजे भाजप नव्हे आणि भाजप म्हणजे महाराष्ट्र अजिबात नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात शासकीय व्यासपीठाचा पक्षीय प्रचारासाठी वापर करणे हा राज्य शिष्टाचाराचा अपमान आहे. जनतेच्या कराच्या पैशातून चालणाऱ्या योजनांवर एका पक्षाची मालकी सांगण्याचा प्रयत्न लोकशाहीला घातक असून, हा सत्तेचा उघड गैरवापर आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *