Headlines

'शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या':अण्णा हजारेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पत्राद्वारे मागणी; अहिल्यानगरमध्ये अण्णांचे मौन धरणे आंदोलन




नवी दिल्लीत विद्यार्थ्यांचे आंदोलन सध्या चांगलेच तापले असून, या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची थेट मागणी केली आहे. विद्यार्थ्यांच्या या न्याय्य लढ्याला आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी अण्णा हजारे उद्या (गुरुवारी) अहिल्यानगर शहरात मौन धरणे आंदोलन करणार आहेत. पंतप्रधान मोदींना पाठवलेल्या पत्रात अण्णा हजारे यांनी स्पष्ट केले आहे की, लोकशाहीत जनतेचा आवाज दडपून न टाकता संवादाच्या माध्यमातून प्रश्न सोडवणे अपेक्षित असते. गेल्या 25 दिवसांपासून विद्यार्थी आणि त्यांचे पालक शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असून शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. उत्तरदायित्व निश्चित करून एखाद्या मंत्र्याचा राजीनामा घेतल्याने सरकार कोसळत नाही, उलट खात्याचा कारभार नीट न केल्यास पद जाऊ शकते, असा कठोर संदेश इतर मंत्र्यांना जाईल. यामुळे सरकारचा कारभार अधिक पारदर्शक व सक्षम होईल, अशी ठाम भूमिका अण्णांनी पत्रात मांडली आहे. सरकारची भूमिका अजिबात योग्य नाही याच पत्रात अण्णांनी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचाही संदर्भ देत सरकारच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत. वांगचुक यांना उपोषण स्थळावरून ज्या पद्धतीने बळाचा वापर करून हटवण्यात आले, त्याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कारवाई करण्यापूर्वी सरकारने त्यांच्याशी कोणतीही चर्चा केली नाही. तसेच इतके दिवस दिल्लीत उपोषण सुरू असतानाही सरकारच्या एकाही प्रतिनिधीने आंदोलनकर्त्यांशी संवाद साधण्याची तसदी घेतली नाही, ही बाब लोकशाहीला मारक असून सरकारची ही भूमिका अजिबात योग्य नसल्याचे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे. अनावश्यक बळाचा वापर टाळला गेला पाहिजे अण्णा हजारे म्हणाले, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत घडलेल्या हिंसाचाराच्या व पोलिस कारवाईच्या बातम्या अत्यंत वेदनादायक आहेत. लोकशाही व्यवस्थेत अशा प्रकारच्या घटना घडणे कोणाच्या हिताचे नाही. कोणत्याही परिस्थितीत हिंसा, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान किंवा अनावश्यक बळाचा वापर टाळला गेला पाहिजे, असे माझे ठाम मत आहे. देशातील तरुण अनेक प्रश्नांमुळे अस्वस्थ आहेत पुढे बोलताना अण्णा हजारे म्हणाले, देशातील तरुण पेपरफुटी, भरती प्रक्रियेतील विलंब, बेरोजगारी व इतर अनेक प्रश्नांमुळे अस्वस्थ आहेत. या अस्वस्थेकडे केवळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून न पाहता ती समाजातील वेदना व अपेक्षा म्हणून समजून घेणे आवश्यक आहे. नीट पेपर परीक्षेचा पेपर फुटला. 22 मुलांनी निराश होऊन आत्महत्या केल्या. फेरपरीक्षेच्या निकालामध्येही मोठा गोंधळ झाल्याच्या बातम्या आहेत. सरकारी कारभारामध्ये काही गैरकारभार उघडकीस आला की त्याची जबाबदारी खालच्या माणसांवर टाकायची आणि चांगले जे असेल त्याची श्रेय सरकारने घ्यायचे हे योग्य नाही. वरिष्ठांची जनतेप्रती जबाबदारी व उत्तरदायित्व आहे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *