![]()
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने शैक्षणिक सत्र २०२६-२७ साठी २९ महाविद्यालयांवर प्रवेश बंदी घातली आहे. प्राध्यापकांची भरती न केल्याने विद्यापीठाने हा कठोर निर्णय घेतला आहे. यामुळे ऐन प्रवेश प्रक्रियेच्या काळात या महाविद्यालयांना मोठा फटका बसला आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेनेही या निर्णयाला मंजुरी दिली आहे. संबंधित महाविद्यालयांवर शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्येही प्रवेश बंदी घालण्यात आली होती. त्यावेळी या महाविद्यालयांनी पदभरती करण्यासंदर्भात विद्यापीठाला कायदेशीर प्रतिज्ञापत्र लिहून दिले होते. मात्र, प्रतिज्ञापत्र देऊनही या महाविद्यालयांनी आवश्यक पदभरती प्रक्रिया पूर्ण केली नाही. नियमांचे उल्लंघन आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीला कारणीभूत ठरणाऱ्या या भूमिकेमुळेच विद्यापीठाने अखेर कठोर पाऊल उचलत सत्र २०२६-२७ साठी त्यांच्यावर प्रवेश बंदी कायम ठेवली आहे. दरम्यान, प्रवेश बंदी घालण्याच्या यादीत इतरही काही महाविद्यालयांचा समावेश होता. त्यापैकी काही महाविद्यालयांना अटी-शर्तींवर तात्पुरती शिथिलता देण्यात आली आहे. संकेतस्थळावरील ‘परिशिष्ट-अ’ मध्ये समाविष्ट असलेल्या या महाविद्यालयांना नामांकन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ‘पदभरती पूर्ण करण्याच्या अटीवर’ प्रवेश बंदीतून तात्पुरती मुभा मिळाली आहे. याचा अर्थ, ही महाविद्यालये तात्पुरते प्रवेश घेऊ शकतील, परंतु त्यांना दिलेल्या वेळेत शिक्षकांची पदे भरणे बंधनकारक असेल. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेश घेण्यापूर्वी पालक व विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन महाविद्यालयाची पात्रता तपासूनच प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी केले आहे. यामुळे भविष्यात होणारी फसवणूक व शैक्षणिक नुकसान टाळता येईल. प्रवेश बंदी घालण्यात आलेल्या महाविद्यालयांमध्ये अमरावती जिल्ह्यातील महाराष्ट्र कला महाविद्यालय (शिराळा), स्व. पंचफुलाबाई भारसाकळे महाविद्यालय (सातेगाव), श्रीराम महाविद्यालय (मोर्शी), मधुबन महाविद्यालय (धारणी), डॉ. एस. एस. गोरडे विज्ञान महाविद्यालय (अचलपूर) यांचा समावेश आहे. याशिवाय अकोल्यातील गयादेवी जोशी आर्यभट महाविद्यालय, सौ. वेदेही विष्णू सराफ महाविद्यालय, गुलाम जैनुल आबोदिन कला महाविद्यालय (वाडेगाव), मेघे इन्स्टिट्युट ऑफ ॲडव्हान्स स्टडीज, श्री. व्ही. के. जोशी महाविद्यालय (गायगाव) आणि बुलढाण्यातील ग्रंथालय व माहितीशास्त्र महाविद्यालय, व्यवसाय प्रशासन महाविद्यालय (आरस लेआऊट), श्रीरामभाऊ शेळके विधी महाविद्यालय (खामगाव), सत्यजित कॉलेज ऑफ सायन्स (मेहकर) व खामगावच्या स्व. गजानन माणिकरावजी गावंडे विज्ञान महाविद्यालयासह वाशिम जिल्ह्यातील दोन आणि यवतमाळ जिल्ह्यातील तीन महाविद्यालयांचा समावेश आहे.
Source link
अमरावती विद्यापीठातील 29 महाविद्यालयांवर प्रवेश बंदी:प्राध्यापक भरती न केल्याने विद्यापीठाचा कठोर निर्णय