![]()
आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त राहुरी येथील कै. लालाशेठ बिहाणी विद्यामंदिर प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या भव्य दिंडी सोहळ्याने शहरात भक्तिमय वातावरण निर्माण केले. टाळ-मृदुंगाच्या गजरात, विठ्ठल-रुक्मिणीच्या वेशभूषेत सजलेल्या विद्यार्थ्यांनी आणि पर्यावरण जनजागृतीच्या संदेशांनी सजलेल्या फलकांनी नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. प्रशालेच्या वतीने इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयातून सुरू झालेली ही दिंडी शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत गोकुळ कॉलनी येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरापर्यंत पोहोचली. दिंडीमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी वारकरी परंपरेचे दर्शन घडवत विविध पारंपरिक वेशभूषा परिधान केल्या होत्या. विद्यार्थ्यांनी हातात भगवे झेंडे आणि पर्यावरण संवर्धनाचे संदेश देणारे फलक घेतले होते. “झाडे लावा, झाडे जगवा”, “स्वच्छता हीच सेवा” यांसारख्या संदेशांमधून समाजप्रबोधनाचा अनोखा प्रयत्न करण्यात आला. टाळ-मृदुंगाच्या निनादात विद्यार्थ्यांनी शहरातील प्रमुख चौकांमध्ये आकर्षक रिंगण सादर केले. या मनोवेधक सादरीकरणामुळे नागरिकांनी दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत करत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. दिंडीतील विठ्ठल-रुक्मिणीच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. वारकरी संप्रदायातील भक्ती, संस्कार आणि सामाजिक जाणीव यांचा सुंदर संगम या दिंडीत पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध सहभागामुळे संपूर्ण दिंडी सोहळा विशेष ठरला. या उपक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही सहभाग नोंदवत आषाढी एकादशीचा आनंद द्विगुणित केला. या दिंडीमुळे राहुरी शहरात भक्ती, संस्कृती आणि सामाजिक जनजागृतीचा संदेश दिला.
Source link
टाळ-मृदुंगाच्या तालावर राहुरीकर झाले तल्लीन:दिंडी सोहळ्याने वेधले उपस्थितांचे लक्ष, विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश