![]()
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालयात विशेष आरोग्य शिबिर तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रतिबंधात्मक, निदानात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिराचे उद्घाटन आमदार सुनील कांबळे आणि आमदार बाबुराव पठारे यांच्या हस्ते झाले. यावेळी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय व ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता, वरिष्ठ अधिकारी, विभागप्रमुख, निवासी डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. शिबिरादरम्यान विविध आरोग्य तपासणी केंद्रांना भेट देऊन मान्यवरांनी नागरिकांशी संवाद साधला तसेच लवकर निदान आणि वेळेवर उपचाराचे महत्त्व अधोरेखित केले. शिबिरात रक्तदान, स्तन कर्करोग तपासणी, गर्भाशय मुख कर्करोग तपासणी, बोन मिनरल डेन्सिटी (बीएमडी), नेत्र व मोतीबिंदू तपासणी, मुख कर्करोग तपासणी, स्क्रब टायफस तपासणी, जनरल आजार तपासणी आणि आयईसी जनजागृती अशा विविध सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. रक्तदान शिबिरात ११२ जणांनी रक्तदान केले, तर स्तन कर्करोग तपासणीसाठी ५०३, गर्भाशय मुख कर्करोग तपासणीसाठी २४३, बीएमडी तपासणीसाठी ४९२, नेत्र तपासणीसाठी १७७, मुख कर्करोग तपासणीसाठी १०८, स्क्रब टायफस तपासणीसाठी २६०, जनरल आजार तपासणीसाठी ४८६ आणि आयईसी जनजागृती उपक्रमात ५११ नागरिक सहभागी झाले. एकूण २,५९१ नागरिकांनी या विशेष आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.
Source link
ससून रुग्णालयात विशेष आरोग्य शिबीर:अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त 2,591 नागरिकांना आरोग्य सेवा