![]()
नाशिक शहर आणि धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला यंदाच्या मोसमातील सर्वात मोठा पूर आला आहे. संततधार पावसामुळे गोदावरी आणि दारणा नद्या दुथडी भरून वाहू लागल्या असून ऐतिहासिक रामकुंड परिसरातील सर्व मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. प्रसिद्ध ‘दुतोंड्या मारुती’च्या थेट गळ्यापर्यंत पुराचे पाणी पोहोचले असून सायंकाळनंतर गोदावरी नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नाशिक जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुख्य गंगापूर धरण तब्बल ९७ टक्के भरले आहे. वरील कश्यपी आणि गौतमी गोदावरी धरणांमधून सोडण्यात आलेले पाणी गंगापूर धरणात जमा होत असून तेथून सध्या १३,००० क्यूसेक वेगाने गोदावरी पात्रात विसर्ग सुरू आहे. याशिवाय दारणा धरणातूनही १५,००० क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. गंगापूर धरणातून सोडलेले पाणी रामकुंडापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे ५ तासांचा कालावधी लागतो. पावसाचे पाणी आणि धरणातील विसर्ग मिळून होळकर पुलाखाली पाण्याचा प्रवाह तब्बल २४,००० क्यूसेकपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया गोदावरी नदीच्या वाढत्या पाणीपातळीवर जिल्हा प्रशासन बारीक लक्ष ठेवून आहे. परिस्थितीचा आढावा घेताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, “गोदावरी नदीपात्रात पाण्याचा साठा वेगाने वाढला आहे. कश्यपी आणि गौतमी गोदावरी धरणातून पाणी गंगापूर धरणात सोडले जाते. गंगापूर धरण ९७ टक्के भरले असून तेथून सोडलेले पाणी ५ तासांत रामकुंडात पोहोचते. होळकर पुलाजवळ जेव्हा १९,००० क्यूसेक पाण्याचा विसर्ग होतो, तेव्हा गोदावरी नदी धोक्याची पातळी ओलांडते. सध्याचा विसर्ग आणि पावसाचा जोर पाहता सायंकाळनंतर पाणी धोक्याची पातळी ओलांडून भांडी बाजार आणि सराफ बाजार परिसरात शिरण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांनी व दुकानदारांनी खबरदारी बाळगावी.” सोमेश्वर धबधब्याचे रौद्ररूप; पर्यटकांना प्रवेशबंदी गोदावरीला आलेल्या भीषण पुरामुळे आणि गंगापूर धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे प्रसिद्ध सोमेश्वर धबधबा ओसंडून वाहू लागला असून त्याने अत्यंत रौद्ररूप धारण केले आहे. पर्यटकांची संभाव्य गर्दी आणि जीवितहानी टळावी यासाठी प्रशासनाने धबधबा परिसरात पर्यटकांना जाण्यास सक्त मनाई केली आहे. गोदावरीच्या पुरामुळे रामसेतू पूल, गाडगे महाराज पूल आणि रामकुंड परिसरातील छोटे-मोठे पूल व मंदिरे जलमय झाली आहेत. पोलिसांनी नदीकाठी कडक बंदोबस्त तैनात केला असून नागरिकांना पुराचे पाणी पाहण्यासाठी गर्दी न करण्याचे आणि सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.्र
Source link
नाशिकमध्ये पावसाचे धुमशान!:गोदावरीला यंदाच्या मोसमातील सर्वात मोठा पूर; दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी