Headlines

संत मेळा:'विठ्ठल-रुक्मिणीं'चे प्रायश्चित्त, संन्याशाच्या मुलांचे शुद्धीपत्रक, वेदाचा खरा अर्थ सांगणारे ज्ञानेश्वर आणि नेवासा येथील पैस खांब!




संत ज्ञानेश्वरांचा जन्म इसवी सन 1275 मधला. तेव्हा महाराष्ट्रात यादव वंशाचे राजा रामदेवराय यांचे राज्य होते. ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायात याचा उल्लेख येतो. त्या काळी अंधश्रद्धा पराकोटीला पोहचलेली. भूत, नवससायास, जादूटोणा, कर्मकांडाचे महत्त्व प्रचंड वाढलेले. ज्ञानेश्वरांसह त्यांच्या सर्व भावंडांना ‘संन्याशाची मुले’ म्हणून वाळीत टाकले गेले. मग इतरांची काय अवस्था असेल? त्यांच्या पिळकवणुकीला तर पारावार नव्हता. याच विचारांनी अस्वस्थ झालेल्या ज्ञानेश्वरांनी वेदाचा खरा अर्थ सर्व सामान्यांना सांगण्यासाठी गीतेवरील टीका सांगणारी ज्ञानेश्वरी रसाळ ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरीचे भाषावैभव हा वेगळा अभ्यासाचा विषय. ज्ञानेश्वरीच्या समारोपाच्या अध्यायात संत ज्ञानेश्वर म्हणतात, ‘वेद हे सर्व दृष्टीने संपन्न आहेत. पण ते फक्त तीनच वर्णाची काळजी वाहतात. त्यांनाच वेदाधिकार देतात. वेदांचा हा दोष नाहीसा करण्यासाठी कृष्णाने गीता सांगितली. गीतेने चारही वर्णांना, सर्व भूतांना मोक्षाचा मार्ग मोकळा केला. ज्ञानेश्वरांनीही कर्मकांड टाळून निष्काम कर्मयोगाचा विचार आग्रहाने मांडला. बाह्य संन्यासापेक्षा अंतरंग संन्यास महत्त्वाचा मानला. श्री. म. माटे म्हणतात यांच्या म्हणण्याप्रमाणे ‘पारमार्थिक लोकशाही’ स्थापन केली. जाणून घेवू ‘विठ्ठल-रुक्मिणी’ ते संत ज्ञानेश्वरांचे प्रायश्चित्त, ‘ज्ञानेश्वरी’ आणि नेवासे येथील पैस खांबापर्यंतचा हा पारमार्थिक प्रवास. संत नामदेव ज्ञानेश्वरांचे समकालीन. त्यांनी ज्ञानोबारायांचे रसाळ अभंगमय चरित्र लिहिले. हे ज्ञानेश्वरांचे पहिले चरित्र मानले जाते. आदि, समाधी व तीर्थावळी या तीन अध्यायात त्यांनी माउलींचे चरित्र सांगितले. नामदेव गाथामध्ये हे अभंग वाचायला मिळतात. असे म्हणतात की, आदिचे अभंग मुखोद्गत असल्याशिवाय वारकरी संप्रदायाची दीक्षा पूर्ण होत नाही. विशेष म्हणजे या अभंगाच्या प्रामाण्याबद्दल वारकरी मंडळाची पूर्ण मान्यता आहे. आपण ज्ञानेश्वर माउलींचा पैस खांबापर्यंतचा सारा प्रवास याच आधारे समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत. पैठणजवळच्या आपेगावचे. विठ्ठलपंतांच्या वडिलांचे नाव गोविंदपंत. विठ्ठलपंतांचे शिक्षण झाले. त्यांना तरुणपतीचे आध्यात्माचे वेड लागले. त्यामुळे त्यांनी तीर्थयात्रा सुरू केली. त्यांनी आळंदी गाठली. आळंदीचे कुलकर्णी सिधोपंत. त्यांना पांडुरंगाने दृष्टांत दिला आणि त्यांनी आपली मुलगी रुक्मिणीबाईंचे लग्न विठ्ठलपंतांशी लावून दिले. विठ्ठलपंत तीर्थयात्रा आटोपून सपत्नीक आपेगावला आले. त्यानंतर सिधोपंतांनी त्यांना पुन्हा सहकुटुंब आळंदीला नेले. मात्र, विठ्ठलपंताचे मन संसारात रमेना. त्यांनी पत्नी रुक्मिणीबाईंकडे आपल्याला संन्यास घ्यायची परवानगी दे, असे साकडे घातले. त्यांनी सुरुवातीला नकार दिला. मात्र, नंतर विठ्ठलपंतानी हट्टच पुरवला. शेवटी रुक्मिणीबाईंनी त्यांना संन्यास घेण्याची परवानगी दिली. निरोपाची वाट पाहे भलत्या मिषें ।
रखुमाई असे सावधान ।।
असतां दुश्चित्तपणें निरोप पुसिला ।
जा, जा, म्हणे दिधला अवसरू ।।
जाऊनि विठ्ठलें घेतला संन्यास ।
चिंता रखुमाईस पडली भारी ।। विठ्ठलपंतांनी काशी गाठली. तिथे स्वामी रामानंदांकडून संन्यास घेतला. संन्यासानंतर त्यांचे नाव विठ्ठलपंतावरून चैतन्यस्वामी झाले. योगायोग पाहा हेच रामानंद तीर्थयात्रा करत आळंदीला आले. तिथे सर्व भाविकांसोबत रुक्मिणीबाईंनीही त्यांना नमस्कार केला. यावेळी रामानंदांच्या मुखातून नकळत ‘पुत्रवती भव’ असा आशीर्वाद दिला गेला. हे ऐकूण रुक्मिणीबाईंना हासू आले. शेवटी रामानंदांनी त्यांच्याकडून याचे कारण विचारून घेतले. विठ्ठलपंतांच्या संन्यासाची बातमी त्यांना समजली. त्यांनी त्यांचे रूप कसे आहे, हे विचारले. ते वर्णन ऐकताच त्यांना खात्री पटली ही व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून चैतन्यस्वामीच आहेत. स्वामी रामानंद सिधोपंत आणि रुक्मिणीबाईंना घेवून काशीला आले. त्यांच्यासमोर चैतन्यस्वामींनी सारे काही कबूल केले. रामानंदांनी त्यांना पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारायला लावला आणि आळंदीला धाडून दिले. उठवूनि श्रीपादें दिधलें आश्वासन ।
म्हणती करी ग्रहण इचें आतां ।।
अविधि कर्माचें न धरावें भय ।
यासी आहे साह्य जगदीश ।। विठ्ठलपंतांनी संन्यास सोडला. पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारला. त्यामुळे आळंदीतल्या ब्राह्मणांनी त्यांना वाळीत टाकले. सर्वांनी त्यांच्यासोबतचा व्यवहार तोडला. वर्षामागून वर्षे गेली. एक तप लोटले. विठ्ठलपंतांना चार मुले झाली. या मुलांसाठी तरी आपल्याला समाजात घ्या, अशी विनंती पुन्हा विठ्ठलपंतांनी ब्राह्मणांना केली. मात्र, त्यांचे काळीज अती कठोर. त्यांनी पुन्हा नकारच दिला. शेवटी विठ्ठलपंतांनी ‘तुम्ही सांगाल ते प्रायश्चित्त घेऊ, पण आम्हास शुद्ध करून घ्या,’ अशी विनवनी केली. शेवटी त्यांनी विठ्ठलपंतांसमोर देहांत प्रायश्चित्त हा एकमेव पर्याय ठेवला. पाहती ग्रंथ सभाश्रेष्ठ महाजन ।
वैदिक शास्त्रज्ञ पुण्यश्लोक ।
देहान्तप्रायश्चित्त असें या बोलिलें ।
विचारुनि भलें हित करा ।।
श्रीपाद म्हणती अवश्य करीन ।
देह हें दंडीन अनुतापें ।।
त्रिवेणीसंगम घालीन कर्वतीं ।
गेला पूर्वस्थिति वीतरागें ।। विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाईंनी आपल्या चार सोन्यासारख्या मुलांसाठी हा आदेश शिरसावंद्य मानला. आणि दोघांनीही आपल्या पश्चात आपल्या मुलांचे कल्याण होईल हा हेतू ठेवून देहांत प्रायश्चित्त घेतले. त्यामुळे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताई ही भावंडे पोरकी झाली. तरी सुद्धा या भावंडांना ब्राह्मण समाजाने आपल्यात घेतले नाही. त्यांना विठ्ठलपंत-रुक्मिणीबाईंच्या देहांत प्रायाश्चित्तानंतरही वाळीत टाकले. निवृत्तीनाथांनी पुन्हा साऱ्यांना आपल्याला समाजात घ्या, असे साकडे घेतले. मात्र, ब्राह्मण समाजाने त्यांना आत्ताचे पैठण म्हणजेच तेव्हाचे प्रतिष्ठानला जा. तिथून तुम्ही पत्र आणले, तरच तुम्हाला पुन्हा समाजात प्रवेश देण्यात येईल, असे सांगितले. या भावंडांनी आळंदीकरांचे पत्र घेतले आणि शुद्धीपत्र आणायला पैठणला निघाले. मात्र, ही संन्याशाची मुले हे समजताच पैठणच्या ब्राह्मणांनीही त्यांना शुद्धीपत्रक नाकारले. केली ब्रह्मसभा बैसले वरिष्ठ ।
होतें तैसें स्पष्ट निवेदिलें ।।
पत्र वाचोनियां सकळ झालें श्रुत ।
संन्याशाचे पुत्र कळों आले ।।
नाहीं प्रायश्चित्त उभयतां कुलभ्रष्ट ।
बोलियले श्रेष्ठ पूर्वापार ।।
या एक उपाय असें शास्त्रमतें ।
अनन्य भक्तीतें अनुसरावें ।। तीव्र अनुतापें करावें भजन ।
गो खर आणि श्वान वंदूनिया ।।
वंदावे अंत्यज ब्रह्मभावनेसी ।
ऐसे पद्धतीसी बोलियेलें ।।
ऐकोनी निवृत्ती संतोषला चित्तीं ।
धन्य तुमची वदती तीर्थरूप ।।
ज्ञानदेव म्हणे सांगाल तें मान्य ।
मुक्ताई सोपान आनंदलीं ।। पैठणच्या ब्राह्मणांनीही संन्याशाच्या मुलांना प्रायश्चित्त मिळणे शक्य नाही. त्यांनी फक्त अनन्यभक्तीभावाने भजन करावे. गायी, श्वान आणि अंत्यजांस ब्रह्मभावनेने पूजावे असे सांगितले. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, मुक्ताई, सोपानदेवांनी ते आनंदाने कबूल केले. त्यानंतर ज्ञानोबारायांनी आपल्या वाकचातुर्याने आणि चमत्काराने पैठणच्या ब्राह्मणांचे गर्वहरण केले. परमात्मा सगळ्यांच्या हृदयात आहे, असे ज्ञानोबांनी सांगताच पैठणचे ब्राह्मण त्यांच्यावर हासले. तेव्हा त्यातील काही जणांनी रेड्याला काठीने मारहाण केली. त्याचे वळ ज्ञानोबांच्या पाठीवर उमटले. या कृतीनेही पैठणच्या ब्रह्मवृदांचे डोळे उघळले नाहीत. त्यांनी परमात्मा रेड्यामध्ये आहे, तर रेड्यामुखी वेद म्हणवून दाखवा, असे सांगितले. ज्ञानोबांनी रेड्यामुखी वेद म्हणविले आणि पैठणच्या ब्राह्मणांचा गर्व क्षणात उतरला. त्यांनी आपली चूक कबूल केली. ज्ञानोबारायांसह साऱ्या भावंडांना नमस्कार केला. पैठणमध्ये रात्री ज्ञानोबारांयांचे कीर्तन रंगले. त्याच कर्मठ ब्राह्मणांनी या भावंडाचे मोठेपण मान्य केले. हे परलोकीचे देवत्रय आहेत. त्यांना प्रायश्चित्त देणारे आम्ही कोण? असे पत्र या भावंडांना दिले. कर्मठ अभिमानें ठकलों देहबुद्धि ।
गोविलेले विधि निःसंदेह ।।
आणिकांसीं सांगो आपण नाचरो ।
लटिकेची हुंबरो प्रतिष्ठेसी ।।
मिळोनि समस्त सोडियेलीं शास्त्रें ।
विचारोनि पत्र लिहियेले ।।
हे परलोकीचें तारु देवत्रय यासी ।
प्रायश्चित्त यांसीं द्यावें कोणें ।।
लिहोनियां पत्र दिधलें तया ।
समस्तांशी निवृत्ति नमस्कारिलें ।। संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव आणि संत मुक्ताबाई पैठणहून शुद्धीपत्रक मिळवून रेड्यासह आळंदीकडे निघाले. परतीच्या प्रवासामध्ये त्यांना नेवसा येथे प्रवरा नदीचा रम्य परिसर लागला. तिथली वनराई, निसर्ग पाहून ही भावंडे जवळपास दोन ते अडीच वर्ष नेवासे येथेच रमले. या काळात त्यांचा येथील मुक्काम करविरेश्वर मंदिरात होता. या मंदिरातील पवित्र खांबाला टेकून संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी या ग्रंथराजाचे लिखाण केले. हा काळ होता शके 1212 अर्थातच इसवी सन 1290 चा. ज्या खांबाला पाठ टेकून माउलींनी ज्ञानेश्वरी लिहिली तो खांब पैस खांब म्हणून ओळखले जातो. जवळपास पंधराव्या शतकापर्यंत ते मंदिर अस्तित्वात होते. काळाच्या ओघात करविरेश्वर मंदिर नष्ट झाले. मात्र, संत ज्ञानेश्वरांनी स्पर्श केलेला मंदिरातील पैस खांब हा एकमेव अवशेष आजही नेवासे येथे उभा आहे. या पवित्र खांबाभोवती कालांतराने मंदिर बांधण्यात आले. या मंदिराचा दोनवेळस जीर्णोद्धार झाला. त्यानंतर अलीकडील काळात म्हणजेच 1939 मध्ये नेवासे तालुक्यातील तांबे रांजणगाव (देवी) येथील बन्सी महाराज यांनी आपली वडिलोपार्जित सर्व मालमत्ता विकून या मंदिराचा जीर्णोद्धार केला. बन्सी महाराज यांनी त्यांचे गुरू सोनोपंत दांडेकर यांच्या प्रेरणेने हे काम केले. खांबासाठी मंदिर असणारे हे एकमेव पवित्र स्थान म्हणून ओळखले जाते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *