Headlines

साक्षी धोनीने मुलीसह घेतले साई दर्शन:संस्थानला 7 लाखांची देणगी




भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार ‘महेंद्रसिंग धोनी यांची पत्नी साक्षी धोनी यांनी कन्या झिवा हिच्यासह मंगळवारी शिर्डीत येऊन श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी साईबाबांच्या माध्यान्ह आरतीला उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला. या भेटीदरम्यान त्यांनी साईबाबा संस्थानच्या वैद्यकीय निधीसाठी ७ लाख रुपयांची देणगी देऊन सामाजिक बांधिलकी जपली. महेंद्रसिंग धोनी शिर्डीत दर्शनाला कधी येणार? या प्रश्नावर साक्षी धोनी म्हणाल्या, साईबाबांचे बोलावणे आल्याशिवाय कोणीही त्यांच्या दरबारात येऊ शकत नाही. जेव्हा धोनी यांना बाबांचे बोलावणे येईल, तेव्हा आम्ही त्यांना नक्कीच दर्शनासाठी घेऊन येऊ. मी लहानपणापासूनच आई-वडिलांसोबत शिर्डीत येत आहे. येथील ऊर्जेमुळे मनाला शांती मिळते. माझी मुलगी झिवा हिला पहिल्यांदाच या पवित्र भूमीची अनुभूती मिळावी, या इच्छेने मी तिला सोबत आणले आहे, असे साक्षी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. साईबाबांचे दर्शन, द्वारकामाई आणि गुरुस्थान येथे प्रार्थना केल्यानंतर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि उपकार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी साक्षी धोनी यांचा साईबाबांची मूर्ती व शाल देऊन सत्कार केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *