![]()
फलटण तालुक्यातील वाठार निंबाळकर येथे गुरुवारी मध्यरात्री एका भीषण कार अपघातात 3 तरुण कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला, तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत. मित्रांसोबत हॉटेलमध्ये जेवण करून परतताना ताथवडे घाटात फिरण्याचा बेत या तरुणांच्या जीवावर बेतला. अतिशय भरधाव वेगात असलेल्या कारवरील ताबा सुटून गाडी रस्त्याच्या नालीवरील पुलाच्या कठड्याला जोरात धडकल्याने हा अपघात घडला. या अपघातात कारचालक मोहम्मद हुसेन (वय – मूळ रा. अयोध्या, उत्तर प्रदेश), अनिल हेबरम आणि सदानंद पुर्ती (दोघे रा. जमशेदपूर, झारखंड) या तिघांचा मृत्यू झाला आहे. तर नयन अमरजित लोंगाणी (वय 28, मूळ रा. अहिल्यानगर), सौरभ कुमार (रा. झारखंड) आणि एम.डी. सितारे (रा. बिहार) हे तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हे सर्वजण सुरवडी येथील कमिन्स कंपनीत नोकरीला असून वाठार निंबाळकर येथील कंपनीच्या हॉस्टेलमध्ये राहत होते. नेमकी घटना काय घडली? मिळालेल्या माहितीनुसार 23 जुलै रोजी नेहमीप्रमाणे काम उरकून हे सहा मित्र रात्री 8 वाजण्याच्या सुमारास कारने (MH 16 ET 1756) बडेखान येथील हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर हॉस्टेलकडे परतताना मित्रांच्या आग्रहास्तव त्यांनी ताथवडे घाटाकडे गाडी वळवली. पुसेगाव-फलटण रोडने वाठार निंबाळकरकडे येत असताना नियंत्रण सुटल्याने वाठार निंबाळकर गावच्या हद्दीत कार रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या नालीवरील पुलाच्या कठड्याला धडकली आणि पलटी होऊन बाजूला कोसळली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि फलटण ग्रामीण पोलिसांनी तातडीने धाव घेऊन कारमध्ये अडकलेल्या तरुणांना बाहेर काढले व रुग्णवाहिकेतून फलटण येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तिघांची प्राणज्योत मालवली. फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
Source link
फलटणमध्ये भीषण अपघात:भरधाव कार पुलाच्या कठड्याला धडकली, 3 जणांचा मृत्यू, 3 गंभीर जखमी