![]()
मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरातील शेतकऱ्यांनी पिंपरी-चिंचवड शहराला होणाऱ्या बंदिस्त पाईपलाईन विरोधात जन आंदोलन तीव्र करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांची पुणे शासकीय विश्रामगृह येथे भेट घेतली. ९ ऑगस्ट २०११ रोजी मावळ तालुक्यात याच पाईपलाईन योजनेला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी गोळीबार केला होता. या घटनेत कांताबाई ठाकर, मोरेश्वर साठे आणि श्यामराव तुपे या तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता,तर अनेक जण गंभीर जखमी झाले होते. ही योजना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला पवना धरणातून थेट बंद पाईपलाईनद्वारे पाणी नेण्यासाठी होती. मावळमधील सुमारे ७२गावांतील शेतकऱ्यांचा या योजनेला तीव्र विरोध होता. बंदिस्त पाईपलाईनमुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण होईल, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली होती.त्यावेळी राजू शेट्टी यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली आणि तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी संपर्क साधून प्रकल्पाला तातडीने स्थगिती मिळवली होती. राजू शेट्टी यांनी सांगितले की,२०११च्या आंदोलनात भारतीय किसान मोर्चा आणि भाजप आघाडीवर होते आणि त्यांनी या योजनेला तीव्र विरोध केला होता. त्यावेळी विरोधी पक्षात असलेले देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन काँग्रेस व राष्ट्रवादी सरकारवर जोरदार टीका केली होती. आज १५वर्षांनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत असताना, ज्या प्रकल्पाला त्यांनी पूर्वी विरोध केला होता, त्याची स्थगिती उठवून १७००कोटी रुपयांच्या सुधारित प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. शेट्टींच्या मते, फडणवीस यांनी आपले पूर्वीचे विचार बदलले आहेत. त्यांनी आरोप केला की, या प्रकल्पातून शेकडो कोटी रुपयांचा गैरव्यवहार करण्याचा हेतू आहे. शेतकऱ्यांची भूमिका आजही तीच आहे की, पिंपरी-चिंचवड शहराला पाणी देण्यास त्यांचा विरोध नाही, परंतु बंदिस्त पाईपलाईनला विरोध आहे. पण पवना धरणातून बंदिस्त पाईपलाईन करण्याऐवजी गहुंजे येथून नदीतून पाणी लिफ्ट करा आणि आजही पिंपरी चिंचवड शहरास पाणीपुरवठा सुरळीत करा. सदरची योजना झाली तर योजनेचा खर्च कमी होणार आहे व ढपला पाडण्यास मर्यादा पडणार आहेत.कारण याच परिसरातील हजारो शेतकऱ्यांच्या हजारो एकर जमीनी संपादित करून हे धरण बांधले आहे. यामुळे पवना धरण ते गंहुजे या परिसरातील नदीकाठच्या लोकांना बारा महिने शेतीसाठी पाणी उपलब्ध होईल ही शेतकऱ्यांची माफक अपेक्षा आहे आणि ती योग्यच आहे. जर पवना धरणातून बंदिस्त पाईपलाईन केल्यास ऐन उन्हाळ्यात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे व नदीकाठच्या गावांना पिण्याचा व शेतीच्या पाण्याचा फटका बसणार आहे. गावक-यांनी केलेली मागणी एकदम रास्त व योग्य आहे मात्र काही मंडळींना या योजनेतून मोठ्या प्रमाणात ढपला पाडायचा असल्याने हा प्रकल्प देवेंद्र फडणवीस पुन्हा रेटण्याचा प्रयत्न करत आहेत. पवना धरण परिसरातील सर्व शेतकऱ्यांना राजू शेट्टी यांनी विश्वास दिला कि आपण पुन्हा त्याच जोमाने लढा उभारू पण बंदिस्त पाईपलाईन योजना थांबवू व गहुंजे येथूनच पिंपरी चिंचवड महापालिकेला पाणी योजना करण्यास भाग पाडण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
Source link
पवना धरण परिसरातील शेतकरी राजू शेट्टींना भेटले:बंद पाईपलाईन विरोधात जन आंदोलन तीव्र करण्यासाठी चर्चा