Headlines

लाठी-बंदुकीचा धाक दाखवून उपयोग नाही:पोरांनी भीतीला कधीच श्रद्धांजली वाहिलीये…; रोहित पवारांचा सरकारवर घणाघात




दिल्लीतील जंतरमंतर येथे आपल्या न्याय्य हक्कांसाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनी मध्यरात्री भेट दिली. या भेटीनंतर त्यांनी सोशल मीडियावर एक सविस्तर आणि आक्रमक पोस्ट करत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. देशातील तरुणांनी सत्ताधाऱ्यांनी उभ्या केलेल्या जाती-धर्माच्या भिंती पाडून तिरंग्याखाली एकजूट दाखवली आहे, असे सांगत रोहित पवारांनी थेट शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच, तरुणांना बंदुकीचा आणि लाठीचा धाक दाखवणाऱ्या सरकारने आता शहाणे व्हावे, असा इशाराही त्यांनी दिला आहे. मध्यरात्रीची भेट अन् विद्यार्थ्यांचा निर्धार रोहित पवार यांनी मध्यरात्री जंतरमंतरवरील आंदोलनस्थळी जाऊन विद्यार्थ्यांच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी विद्यार्थ्यांचा उत्साह आणि निर्धार पाहून पवार यांनी त्यांचे कौतुक केले. “या तरुणांचे टार्गेट निश्चित असून, जोपर्यंत ते पूर्ण होत नाही, तोपर्यंत ही मुले इथून हलणार नाहीत, हे चित्र रात्री उशिरा स्पष्ट झाले,” असे पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. आम्ही कुणालाही घाबरत नाही रोहित पवार यांनी जेव्हा काही विद्यार्थ्यांना “तुम्हाला भीती वाटते का?” असा प्रश्न विचारला, तेव्हा मुलांनी “हम किसी से डरते नहीं,” असे अत्यंत उत्तर दिले. या तरुणाईची निर्भयता पाहून सरकारवर टीका करताना पवार म्हणाले, “गेल्या १२ वर्षांत सरकारने निर्माण केलेल्या दहशतीला आणि भीतीला या पिढीने कधीच श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यामुळे त्यांना लाठी किंवा बंदुकीचा धाक दाखवून काहीही साध्य होणार नाही.” रोहित पवार यांनी केलेली पोस्ट जशीच्या तशी.. जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांचं टार्गेट फिक्स आहे…
टार्गेट कम्प्लिट केल्याशिवाय ही पोरं हलणार नाहीत, हेच दाखवणारं चित्र रात्री बारा वाजता बघायला मिळालं… रात्री उशिरापर्यंत या पोरांना भेटून त्यांच्या भावना जाणून घेतल्या. जात-धर्म-प्रांत-भाषा या सगळ्या भिंती तोडून देशभरातील युवा केवळ तिरंग्याखाली इथं एकवटलाय. विशेषतः भाजपाने उभारलेल्या जाती-धर्माच्या भिंती इथल्या युवांनी कधीच तोडून भुईसपाट केल्या आहेत. विविधतेतील एकता हे ज्याप्रमाणे भारताचं सौंदर्य आहे, ते खऱ्या अर्थाने इथं बघायला मिळालं. पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त असला तरी वास्तवात ही मुलंच स्वतःहून शिस्त पाळताना दिसत होती. देशाच्या कानाकोपऱ्यातील दानशूर मंडळी स्वतःहून या मुलांना खाद्यपदार्थांची ऑर्डर पाठवत होती. खाद्यपदार्थ कुणी पाठवले हे कुणालाच कळत नाही आणि कुणासाठी पाठवले हेही पाठवणाऱ्याला कळत नाही. या पाठवण्यामागे केवळ माणुसकी आणि देशाचं भविष्य असलेल्या युवांची काळजी ही एकमेव प्रामाणिक भावना इथं दिसली. अहंकारी सत्तेने या मुलांवर लाठ्या चालवून त्यांना जखमी केलं असलं तरी अनेक डॉक्टर मंडळींनी इथं स्वयंस्फूर्तीने सेवा सुरू केलीय. अनेक मुलांना विचारलं की, ‘‘आपको डर लगता है क्या?’’ यावर ‘‘हम किसी से डरते नहीं’’, हे त्यांचं अत्यंत आश्वासक उत्तर होतं. इथले सर्वच तरुण अत्यंत जबाबदार असून या तरुणाईची भाषा सरकारने समजून घेऊन वेळीच निष्क्रिय मंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे. सरकारने गेली बारा वर्षे निर्माण केलेल्या दहशतीला, भीतीला या पोरांनी कधीच भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केलीय. त्यामुळं त्यांना जर सरकारने बंदुकीचा, लाठीचा धाक दाखवला, तरीही त्याचा काही उपयोग नाही. सरकारने आतातरी शहाणं व्हावं आणि द्वेषाऐवजी प्रेमाची, विसंवादाऐवजी संवादाची, तोडण्याऐवजी जोडण्याची, जाती-धर्मात वाद लावण्याऐवजी बंधुभाव जपण्याची भाषा बोलावी. कारण सरकारच्या लबाडीला बळी पडणारी ही पिढी नाही आणि या पिढीला घाबरवण्याचा प्रयत्न तर आता सरकारने स्वप्नातही करू नये…
झालं ते बस झालं.. आता निष्क्रिय मंत्र्याचा राजीनामा घ्या.. आणि देशाची भावना समजून आतातरी द्वेषाच्या निखाऱ्यावर राजकीय फायद्याच्या भाकरी भाजायचं बंद करा.. हेही वाचा.. CJP च्या अभिजीत दीपकेंना टायफॉइड:पोलिसांनी जंतरमंतरची बॅरिकेडिंग वाढवली; प्रधानांच्या राजीनाम्यावर सरकार आज उत्तर देणार ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके यांना टायफॉइडची लागण झाली आहे. त्यांनी शनिवारी प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडिओद्वारे ही माहिती दिली. दरम्यान, शुक्रवारी रात्री उशिरा दिल्ली पोलिसांनी जंतर-मंतरवरील बॅरिकेडिंग वाढवले. केंद्रीय मंत्र्यांसोबत काल झालेल्या बैठकीनंतर, CJP ने स्पष्ट केले होते की, प्रधान यांनी राजीनामा दिला नाही, तर ते २० जुलैसारखीच कृती करतील. सविस्तर वाचा ‘मोर्चाला गालबोट लावल्यास समारंभपूर्वक पाहुणचार करू’:तिरंगा मोर्चापूर्वी राज ठाकरेंचा इशारा, ‘शिवतीर्थ’वर महत्त्वाची बैठक
नीट पेपरफुटी आणि दिल्लीतील विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ राज आणि उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, या दोन्ही नेत्यांच्या नेतृत्त्वाखाली रविवारी मुंबईत एक भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या नियोजनासाठी राज ठाकरे यांनी शनिवारी त्यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी शहराध्यक्ष, सर्व विभागप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. तसेच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्यांनी ‘या मोर्चाला गालबोट लावण्याचा कोणताही प्रयत्न करू नये,’ असा स्पष्ट इशाराही दिला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *