![]()
पुणे शहरातील हडपसर परिसरातील फुरसुंगी येथे प्रेमप्रकरणातून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली असून, त्याच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे. तनिष्क अजय राईकवार (वय १७, रा. हेवन पार्क, काळेपडळ, हडपसर) असे खून झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. या प्रकरणी रोहित संदीप खाडे (वय २०, रा. पानसरेनगर, येवलेवाडी, कोंढवा) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यासोबत असलेल्या अल्पवयीन साथीदारालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अजय हरीष राईकवार (वय ४९) यांनी फुरसुंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तनिष्कचे आरोपीच्या नात्यातील एका युवतीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. आरोपी आणि तनिष्क मित्र होते. शनिवारी (२५ जुलै) सकाळी सातच्या सुमारास फुरसुंगीतील संकेत विहार परिसरात कचरा डेपोजवळ असलेल्या मोकळ्या जागेत आरोपींनी तनिष्कला मारहाण करून त्याच्या डोक्यात दगड घातला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. तनिष्क गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी अवस्थेतील तनिष्कला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. पसार झालेले आरोपी रोहित आणि त्याच्या अल्पवयीन साथीदाराला पोलिसांनी त्याच दिवशी दुपारी ताब्यात घेतले. या प्रकरणी रोहित याला अटक करण्यात आली असून, पुढील तपास फुरसुंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अमोल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक भूषण पोटवडे करत आहेत.
Source link
प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलाचा खून:एका तरुणासह अल्पवयीन साथीदार ताब्यात