Headlines

ड्रायव्हर वक्तव्यावरून शिवसेना-भाजप आमने-सामने:मिरा-भाईंदरमध्ये राजकीय वाद पेटला; पूर्वेश सरनाईकांचे थेट पत्र




काशीगाव मेट्रो परिसरातील सुमारे ३० टक्के जमिनीच्या वादावरून मिरा-भाईंदरच्या राजकारणात नवा संघर्ष पेटला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या भागातील मोठ्या जमिनी आमदार नरेंद्र मेहता यांच्या मालकीच्या असल्याचा दावा केल्यानंतर वादाला सुरुवात झाली. मात्र, या प्रकरणाने आता वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांचे रूप धारण केले असून दोन्ही बाजूंनी तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार नरेंद्र मेहता यांनी माध्यमांशी बोलताना प्रताप सरनाईक यांच्यावर जोरदार टीका केली. जर माझ्याकडे 30 टक्के जमीन असती, तर सरनाईक मला दूरून बोलावले असते. इतकेच नव्हे तर ते माझे ड्रायव्हर झाले असते, असे वादग्रस्त वक्तव्य मेहता यांनी केले. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वातावरण अधिक तापले असून या वक्तव्यावरून जोरदार चर्चा रंगली आहे. या वक्तव्याचा निषेध करत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक यांनी नरेंद्र मेहता यांना उद्देशून एक पत्र लिहले आहे. या पत्रात त्यांनी मेहता यांच्या वक्तव्याला अत्यंत आक्षेपार्ह आणि खालच्या पातळीचे संबोधले आहे. राजकारणात मतभेद असू शकतात, परंतु व्यक्तीगत पातळीवर टीका करताना मर्यादा पाळणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. पूर्वेश सरनाईक यांनी पत्रात पुढे नमूद केले की, जनतेने दिलेल्या कौलानंतर लोकप्रतिनिधींनी विकासकामांवर लक्ष केंद्रित करणे अपेक्षित आहे. चार वेळा निवडून आलेल्या आमदाराबाबत आणि सध्याच्या मंत्र्यांबाबत अशा प्रकारची भाषा वापरणे ही राजकीय संस्कृतीला शोभणारी नाही. राजकारण हे केवळ वक्तव्ये करण्यासाठी नसून ते संस्कार आणि जबाबदारीची गोष्ट आहे, असे सांगत त्यांनी सभ्यतेचे भान राखण्याचे आवाहन केले. या संपूर्ण वादामुळे मिरा-भाईंदरमधील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. शिवसेना कार्यकर्त्यांमध्येही या प्रकरणावरून संताप व्यक्त होत असून कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना विधानसभा प्रमुख सचिन मांजरेकर यांनी प्रतिक्रिया देताना, आमचा नेता संयमी आहे, त्यामुळे आम्हीही संयम पाळतो, असा टोला लगावला. तसेच आवश्यक असल्यास उत्तर देण्याची ताकद आमच्यात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता दरम्यान, काशीगाव मेट्रो परिसरातील जमीन वादातून सुरू झालेला हा संघर्ष आता वैयक्तिक पातळीवर पोहोचल्याने आगामी काळात राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याऐवजी आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याने नागरिकांमध्येही नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे हा वाद नेमका कोणत्या दिशेने वळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *