Headlines

आषाढी वारीत डायल 108 अंतर्गत विशेष सेवा:2,445 वारकऱ्यांना फायदा, 27 रुग्णवाहिका 24 तास सेवेत; पंढरपूरमध्ये नियंत्रण कक्ष




आषाढी वारीनिमित्त पंढरपूरच्या लाखो वारकऱ्यांसाठी महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा (डायल १०८) अंतर्गत विशेष आरोग्यसेवा पुरवण्यात आली. या सेवेमार्फत २७ रुग्णवाहिका २४ तास तैनात होत्या, ज्यांनी एकूण २,४४५ वारकऱ्यांना वेळेत वैद्यकीय मदत दिली. ही सेवा बीव्हीजीद्वारे संचालित केली जाते. वारकऱ्यांना तात्काळ आरोग्यसेवा मिळावी यासाठी पंढरपूर येथे एक विशेष नियंत्रण कक्ष उभारण्यात आला होता. या कक्षातून पालखी सोहळ्याचे सातत्याने निरीक्षण करून आवश्यकतेनुसार रुग्णवाहिका पाठवण्याचे नियोजन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नियंत्रण कक्षाला भेट देऊन सेवा व्यवस्थेची पाहणी केली होती. या सेवेबाबत बोलताना बीव्हीजीचे चेअरमन हणमंतराव गायकवाड म्हणाले, “पंढरीच्या वारीत भाविकांची सेवा करण्याची संधी मिळणे हे आमचे भाग्य आहे. आरोग्यमंत्री डॉ. प्रकाश अबिटकर यांच्या सूचनेनुसार आम्ही अल्पावधीत २७ रुग्णवाहिकांचे नियोजन केले. वारकऱ्यांना सुरक्षित व आरोग्यमय वारीचा अनुभव मिळावा यासाठी बीव्हीजीचे आरोग्यदूत अहोरात्र कार्यरत होते.” मानाच्या दहा प्रमुख पालख्यांसाठी १०८ रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. यामध्ये संत निवृत्तीनाथ महाराज (त्र्यंबकेश्वर), संत ज्ञानेश्वर महाराज (आळंदी), संत सोपानकाका महाराज (सासवड), संत मुक्ताबाई (मुक्ताईनगर), संत तुकाराम महाराज (देहू), संत नामदेव महाराज (पंढरपूर), संत एकनाथ महाराज (पैठण), रुक्मिणी माता (कौडानेपूर, अमरावती), संत निळोबाराय (पिंपळनेर, पारनेर) आणि संत चांगाटेश्वर महाराज (सासवड) यांच्या पालख्यांचा समावेश होता. आषाढी वारीदरम्यान ‘गुड समरीटन’ स्वयंसेवकांनी ॲपचा प्रभावी वापर केला. आपत्कालीन परिस्थितीत त्यांनी तात्काळ माहिती १०८ नियंत्रण कक्षापर्यंत पोहोचवली, ज्यामुळे रुग्णांना वेळेत वैद्यकीय मदत मिळण्यास मोठी मदत झाली. याबाबत स्वयंसेवक दयानंद मेंशेके यांनी आपला अनुभव सांगितला. ते म्हणाले, “आषाढी वारीपूर्वी शासनामार्फत आयोजित प्रशिक्षणामुळे आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्याचा आत्मविश्वास मिळाला. एक महिला भाविक बेशुद्ध पडताच मी तात्काळ ‘गुड समरीटन’ ॲपद्वारे माहिती दिली. ॲप प्रभावीपणे कार्यरत असल्याने १०८ रुग्णवाहिका अल्पावधीत घटनास्थळी पोहोचली आणि संबंधित महिलेला वेळेत वैद्यकीय उपचार मिळू शकले.”



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *