![]()
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहर काँग्रेस आणि युवक काँग्रेसने शनिवारी आंदोलन करत अमित शहा यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. या आंदोलनादरम्यान काँग्रेसचे अनेक पदाधिकारी पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, दौऱ्यापूर्वी मध्यरात्रीच युवक काँग्रेस व शहर काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक कारवाईअंतर्गत घरातून ताब्यात घेण्यात आल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला आहे. शहर काँग्रेसने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या पोलिस कारवाईचा निषेध म्हणून अमित शहा यांच्या हस्ते लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यास विरोध करण्यात आला. आंदोलनासाठी पोलिसांकडे परवानगी मागण्यात आली होती. सुरुवातीला परवानगी नाकारण्यात आली, मात्र नंतर कार्यक्रमस्थळापासून एक किलोमीटर अंतरावर आंदोलनास परवानगी देण्यात आल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. “हुकूमशहा अमित शहा गो बॅक”, “अमित शहा यांचा धिक्कार असो” आणि “अदानीला पायघड्या, विद्यार्थ्यांना बेड्या” अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. यावेळी पूर्व विभागाचे अध्यक्ष प्रशांत जगताप आणि पश्चिम विभागाच्या अध्यक्षा दीप्ती चौधरी यांनी केंद्र सरकारवर टीका करत विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध व्यक्त केला. आंदोलनादरम्यान प्रशांत जगताप, दीप्ती चौधरी, काँग्रेसचे गटनेते रामचंद्र (चंदू) कदम, राज्य वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी, अरविंद शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पश्चिम विभागाच्या अध्यक्षा दीप्ती चवधरी आणि राज्य वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी म्हणाले की,हुकूमशहा अमित शहा पुण्यामध्ये आलेले असताना विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन करणे हा आम्हाला संविधानाद्वारे मिळालेला अधिकार आहे. मुलींवर लाठीचार्ज करणे व त्यांचा विनयभंग करणारे प्रकार हे अतिशय निदंनीय आहे.‘बेटी बचाव – बेटी पढा ओ’म्हणणारे अमित शहा यांच्या आंदेशाने मात्र महिला व मुलींवर दिल्ली पोलीसांनी हल्ला केला.त्यामुळे अमित शहाने नैतिक जबाबदारी स्विकारून राजीनामा द्यावा. दुसरीकडे, युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना गृहमंत्री यांच्या दौऱ्यापूर्वी सौरभ अमराळे ,अक्षय जैन, स्वप्नील नाईक, राजू ठोंबरे, सद्दाम शेख आणि गौरव बाळंदे यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांना मध्यरात्री पोलिसांनी घरातून ताब्यात घेऊन सुमारे १६ तास पोलिसांच्या ताब्यात ठेवण्यात आल्याचा दावा केला आहे. तसेच त्यांच्या मोबाईल फोनही पोलिसांनी जप्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे. युवक काँग्रेसचे राज्य मीडिया विभागाचे चेअरमन अक्षय जैन यांनी शांततामय आंदोलन करण्याचा घटनात्मक अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत, पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पोलिसांच्या दडपशाहीने युवक काँग्रेसचा आवाज दाबला जाणार नाही आणि लोकशाही मार्गाने संघर्ष सुरूच राहील, असे त्यांनी म्हटले आहे.
Source link
अमित शहांच्या पुणे दौऱ्यात काँग्रेसचे आंदोलन:अनेक पदाधिकारी ताब्यात, युवक काँग्रेसकडून पोलिस कारवाईवर टीका