![]()
‘कमवा आणि शिका’ या संकल्पनेच्या नावाखाली टीमलीज फाउंडेशन मार्फत बजाज ऑटो कंपनीमध्ये विद्यार्थी प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस) म्हणून कार्यरत असलेल्या हजारो युवक-युवतींच्या विविध मागण्या व समस्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज बजाज ऑटो लिमिटेड कंपनी येथे आंदोलन करण्यात आले. टीमलीज कंपनीमार्फत गेल्या अनेक वर्षांपासून युवक-युवतींना बजाज ऑटोमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून कामाची संधी देण्यात आली आहे. मात्र, डिग्री न मिळणे, अल्प मानधनावर कामगारांप्रमाणे काम करून घेणे, मानधनात वाढ न करणे तसेच प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर भवितव्याबाबत स्पष्टता नसणे, अशा विविध समस्या प्रशिक्षणार्थींनी मनसेसमोर मांडल्या आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून मनसे पदाधिकारी राजू घोरपडे हे संबंधित युवक-युवतींच्या सातत्याने संपर्कात असून, त्यांच्या समस्या मनसे नेते तथा माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगावकर यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. दोन दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यादरम्यान बाळा नांदगावकर साहेबांनी प्रशिक्षणार्थी युवक-युवतींच्या समस्या सविस्तरपणे जाणून घेतल्या आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी मनसे पदाधिकाऱ्यांनी ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे निर्देश दिले. त्यानुसार आज मनसेच्या वतीने हजारो विद्यार्थी प्रशिक्षणार्थी युवक-युवतींसह बजाज ऑटो कंपनी येथे आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर मनसे पदाधिकारी, टीमलीज कंपनीचे प्रतिनिधी, बजाज ऑटो कंपनीचे प्रतिनिधी आणि पोलीस प्रशासन यांच्यात बैठक घेण्यात आली. बैठकीत युवक-युवतींच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. चर्चेनंतर टीमलीज कंपनीने झालेल्या चर्चेसंदर्भातील लेखी पत्र मनसे पदाधिकाऱ्यांना दिले. दरम्यान, युवक-युवतींच्या प्रश्नांवर सकारात्मक व त्यांच्या हिताचा मार्ग काढण्यासाठी बजाज ऑटो कंपनीचे सर्वेसर्वा राजीव बजाज हे येत्या आठवड्यात मनसे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती मनसे राज्य उपाध्यक्ष दिलीप चितलांगे यांनी बैठकीदरम्यान फोनवरून दिली. “हा प्रश्न हजारो युवक-युवतींच्या भवितव्याशी संबंधित आहे. त्यांच्या न्याय्य मागण्यांवर योग्य तोडगा निघेपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील. युवकांच्या भवितव्याशी कोणालाही खेळू दिले जाणार नाही,” अशी स्पष्ट भूमिका मनसे जिल्हा संपर्क अध्यक्ष बिपीन शंकरसिंग नाईक यांनी व्यक्त केली. या आंदोलनाचे नियोजन मनसे पदाधिकारी राजू घोरपडे यांनी विद्यार्थी प्रशिक्षणार्थी प्रतिनिधी गणेश कावळे व त्यांच्या सहकाऱ्यांसोबत केले. यावेळी मनविसेचे राज्य सरचिटणीस राजीव जावळीकर, राज्य उपाध्यक्ष मंगेश साळवे, जिल्हा सचिव रोहित ठेंगे, जिल्हा उपाध्यक्ष कार्तिक पाटील यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर आणि पोलीस निरीक्षक गाडे यांच्यासह पोलीस प्रशासन उपस्थित होते.
Source link
कमवा आणि शिका'च्या नावाखाली पिळवणूक?:बजाज ऑटोतील प्रशिक्षणार्थींच्या हक्कांसाठी मनसेचे आंदोलन