![]()
राज्यातील महिलांवर तसेच तरुणींवरील लैंगिक अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. पालघर जिल्ह्यातील तलासरी येथे एका धक्कादायक आणि संतापजनक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून फिरण्यासाठी गेलेल्या एका तरुणीवर सहा जणांनी मिळून सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. या अमानुष घटनेमुळे पालघर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. पालघरच्या तलासरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या धक्कादायक घटनेप्रकरणी पीडित 19 वर्षीय तरुणीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आहे. महामार्गावर मित्रासोबत उभी असताना दोन दुचाकींवरून आलेल्या सहा नराधमांनी तिला एका बंद पडलेल्या डाक बंगल्यात बळजबरीने नेऊन तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी तलासरी पोलिसांनी वेगाने सूत्रे हलवत सहापैकी तीन आरोपींना अवघ्या काही तासांतच बेड्या ठोकल्या आहेत, तर उर्वरित तीन फरार आरोपींचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे. नेमके काय घडले? पीडित 19 वर्षीय तरुणीने तलासरी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, ती तिच्या मित्रासह दुचाकीवरून फिरायला गेली असताना खामगाव येथे त्यांची दुचाकी स्लीप होऊन ते खाली पडले. नेमक्या त्याच वेळी पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञातांनी तरुणीच्या मित्राला दमदाटी करून तेथून हाकलून लावले. त्यानंतर त्या तिघांनी त्यांच्या आणखी तीन साथीदारांना घटनास्थळी बोलावून घेतले. बंद पडलेल्या डाक बंगल्यावर नेऊन सामूहिक अत्याचार या नराधमांनी पीडित तरुणीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून खामगावजवळील एका बंद डाक बंगल्यावर नेले. तिथे बंगल्याच्या कट्ट्यावर या सहा जणांनी तिच्यावर अमानुषपणे सामूहिक लैंगिक अत्याचार केला. या भयंकर घटनेची फिर्याद दाखल होताच तलासरी पोलिसांनी तत्परतेने चक्र फिरवत सहापैकी तीन आरोपींना तातडीने बेड्या ठोकल्या आहेत. फरार असलेल्या तीन आरोपींचा शोध सुरू या सर्व आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या कलम 70/1 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पालघरच्या पोलिस अधीक्षकांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सध्या फरार असलेल्या इतर तीन आरोपींचा कसून शोध सुरू असल्याची माहिती तलासरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजय गरुड यांनी दिली आहे.
Source link
पालघर हादरले!:तलासरीत 19 वर्षीय तरुणीवर सहा जणांकडून सामूहिक अत्याचार; तिघांना बेड्या, इतर तिघांचा शोध सुरू