![]()
संत नामदेवांच्या जीवनातून आपण समतेचा, सेवा भावनेचा आणि निर्भीड भक्तीचा मार्ग शिकू शकतो. नामस्मरणातून खरे समाज परिवर्तन घडते. नामस्मरण म्हणजे केवळ शब्द नव्हे, तो एक कृतीशील जीवनमार्ग आहे, असे निरुपण नवनाथ महाराज शास्त्री यांनी केले.
.
नामदेव शिंपी समाज ट्रस्टच्या वतीने सावेडी येथील शिंदे मळ्यातील श्री संत नामदेव महाराज मंदिरात संतश्रेष्ठ श्री संत नामदेव महाराज यांचा संजीवन सोहळा भक्तिभावाने व उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम, भव्य दिंडी मिरवणूक, कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. दिवसभर परिसरात विठ्ठलनामाचा गजर आणि भक्तिमय वातावरण होते. संजीवन सोहळ्याच्या दिवशी मच्छिंद्रनाथ देवस्थान, भालगाव येथील नवनाथ महाराज शास्त्री यांचे काल्याचे कीर्तन झाले. त्यांनी संत नामदेव महाराजांचे जीवनचरित्र, विठ्ठलभक्ती, समतेचा संदेश आणि समाजसेवेचे महत्त्व विशद केले. सोहळ्याच्या आदल्या दिवशी काढण्यात आलेल्या दिंडी मिरवणुकीत समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. महिला पारंपरिक वेशभूषेत टाळ-मृदंगाच्या गजरात सहभागी झाल्या. रस्त्याच्या कडेला आकर्षक रांगोळ्या काढून तसेच फुलांची उधळण करत मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले.
ट्रस्टचे अध्यक्ष अशोक वडे म्हणाले, संत नामदेव महाराजांनी समता व समर्पित जीवनाचा आदर्श समाजासमोर ठेवला. उपाध्यक्ष विजय काकडे यांनी मागील आठवडाभर विविध कीर्तनकारांची कीर्तनमालिका आयोजित केल्याचे सांगितले. सचिव राजेंद्र बगाडे यांनी समाजबांधवांचा सहभाग हा सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरल्याचे नमूद केले.
माजी महापौर बाबासाहेब वाकळे, अनिल बोरूडे, पुष्कर कुलकर्णी, सहसचिव सुधीर नेवासकर खजिनदार कृष्णा भस्मे, श्रीकांत बुलबुले, विठ्ठल वनारसे, सुनील अवसरकर, अनिल वनारसे जुगलकिशोर वायचळ, सुरेश लोळगे, दिलीप काकडे आदी उपस्थित होते. कीर्तनानंतर महाप्रसादाचा असंख्य भाविकांनी लाभ घेतला. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राजेंद्र बगाडे यांनी केले.
आठवडाभर रंगली कीर्तनमालिका संजीवन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ट्रस्टच्या वतीने आठवडाभर कीर्तनमालिका घेण्यात आली. बाबासाहेब गोलांडे, तुळशीराम लबडे, कपिल महाराज माळवदे, विठ्ठल महाराज वाघ, निवृत्ती महाराज नामदास, वर्षाताई काळे व ओंकार महाराज जोंजाळ यांनी संतविचारांचा जागर केला.