![]()
छत्रपती संभाजीनगर येथे अनुसूचित जातीच्या (SC) उपवर्गीकरणाच्या विरोधात गुरुवारी महामोर्चा काढण्यात आला. आनंदराज आंबेडकर यांनी या उपवर्गीकरणाला आरक्षणातील जागा अप्रत्यक्षपणे खुल्या प्रवर्गाकडे वळवण्याचे षडयंत्र म्हटले आहे. सरकार आंबेडकरी समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत काढलेल्या या भव्य मोर्चात मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते. राज्य सरकार उपवर्गीकरणाच्या नावाखाली समाजात ‘फोडा आणि जोडा’चे राजकारण करत असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. संभाजीनगरचा हा मोर्चा ऐतिहासिक असून, यापुढे जिल्हास्तरावरही मोर्चे काढले जातील, असा इशारा यावेळी देण्यात आला. तसेच, डिसेंबरमध्ये होणाऱ्या अधिवेशनावर मोर्चा काढून घेराव घालण्यात येईल, असेही आंदोलकांनी स्पष्ट केले. आनंदराज आंबेडकर यांनी उपवर्गीकरणाच्या उद्देशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, “जर उपवर्गीकरण करायचेच असेल, तर आधी खुल्या प्रवर्गाचे उपवर्गीकरण करा. म्हणजे देशातील नोकऱ्या आणि शिक्षण कोणी लाटले आहे, हे उघड होईल.” त्यांनी पुढे सांगितले की, मातंग समाजात शैक्षणिक मागासलेपणामुळे पुरेसे उमेदवार उपलब्ध न झाल्यास, तीन वेळेनंतर त्या जागा खुल्या प्रवर्गाला दिल्या जातील. हे अनुसूचित जातीचे आरक्षण अप्रत्यक्षपणे काढून घेण्याचे षडयंत्र आहे, असेही ते म्हणाले. यावेळी कार्यकर्त्यांना आपसातला वाद टाळण्याचे आवाहन करण्यात आले. काही घटकांकडून महापुरुषांबद्दल भाष्य करून वाद निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशा चिथावणीखोर वक्तव्यांना बळी न पडता आपसातला वाद वाढवू नका, असे आवाहन आनंदराज आंबेडकर यांनी केले. बाबासाहेबांच्या “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” या विचारांवर चालून आंबेडकरी समाजाने शिक्षणावर भर द्यावा, असा संदेशही त्यांनी दिला.
Source link
आनंदराज आंबेडकर म्हणाले-:SC उपवर्गीकरण आरक्षणातील जागा खुल्या प्रवर्गाकडे वळवण्याचे षडयंत्र; संभाजीनगरमध्ये महामोर्चा