Headlines

'विरोधकांना शब्दांनी नव्हे, कामातून उत्तर देईन':उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा निर्धार, देवेंद्र फडणवीसांचेही मानले आभार




काँग्रेसच्या टीकेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या इंग्रजी भाषेतील भाषणाचे आणि आत्मविश्वासाचे कौतुक करत त्यांची खंबीर पाठराखण केली, तसेच ‘महिला राजकारणात यशस्वी होऊ शकत नाहीत’ ही विरोधकांची संकुचित मानसिकता असल्याचा सणसणीत टोलाही लगावला. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या या भक्कम पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवार यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले असून, महिला नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या विरोधकांना आता शब्दांनी नव्हे तर आपल्या कामातून उत्तर देण्याचा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. सुनेत्रा पवार म्हणाल्या, महिला नेतृत्वाबद्दलच्या संकुचित मानसिकतेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले स्पष्ट आणि ठाम उत्तर मनापासून स्वागतार्ह आहे. माझ्या इंग्रजी भाषणाचे आणि आत्मविश्वासाचे त्यांनी केलेले कौतुक माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. महिला राजकारणात यशस्वी होऊ शकत नाहीत अशा पूर्वग्रहातून होणारी टीका ही महाराष्ट्रातील महिलांच्या कर्तृत्वाचा अवमान करणारी आहे. विरोधकांच्या या वक्तव्यातून त्यांची महिलांविषयीची मानसिकता स्पष्ट होते. पुढे बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, अशा खालच्या पातळीवरील टीकेला मी शब्दांनी उत्तर देणार नाही, तर माझ्या कामातून आणि कर्तृत्वातूनच उत्तर देईन. महाराष्ट्रातील महिला सक्षम आणि आत्मविश्वासू असून प्रत्येक जबाबदारी पेलण्याची क्षमता त्यांच्यात आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेली भूमिका ही केवळ व्यक्तिगत समर्थनाची नसून राजकारणातील प्रत्येक महिलेच्या आत्मविश्वासाची पाठराखण करणारी आहे, अशा भावना सुनेत्रा पवारांनी व्यक्त केल्या आहेत. सुनेत्रा पवारांवरील टीकेला देवेंद्र फडणवीसांकडून सडेतोड उत्तर सुनेत्रा पवार यांच्यावर गुंगी गुडिया म्हणत कॉंग्रेसने टीका केली होती. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, तुम्ही कदाचित वहिनींचं पहिल्यांदा इंग्रजीत भाषण ऐकलं असेल, मी याच्यापूर्वी सहा-सात वेळा ऐकलं आणि प्रत्येक वेळी वहिनी कॉन्फिडेंटलीच बोलतात. मला असं वाटतं की, काही लोक डोळ्याला पट्टी बांधून बसले असल्यामुळे आणि त्यांचे विचारच इतके बुरसटलेले असल्यामुळे त्यांना असं वाटतं की एखादी महिला ही राजकारणामध्ये यशस्वी होऊ शकत नाही, एखादी महिला एखादं पद सांभाळू शकत नाही. अशा बुरसटलेल्या विचारांनी ग्रसित लोकांनी ते स्टेटमेंट दिलं होतं, पण स्वर्गीय अजित दादाच्या नंतर वहिनींनी ज्या प्रकारे उपमुख्यमंत्री पद सांभाळलेलं आहे, तेच त्यांना उत्तर आहे, असे फडणवीस यांनी म्हटले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *