![]()
हिंगोली जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजने अंतर्गत आधार प्रमाणीकरणासाठी शेतकऱ्यांची सोय व्हावी या उद्देशाने ८ ठिकाणी गुरुवारपासून ता. १३ दोन दिवसीय शिबीराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुपाटे यांनी दिली आहे. हिंगोली जिल्हयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेमध्ये पहिल्या टप्यात ४४ हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळाला आहे. या शेतकऱ्यांची अॅग्रीस्टॅक क्रमांक बंधनकारक असून या शिवाय त्यांचे आधारप्रमाणीकरणे करणे आवश्यक आहे. जिल्हयातील आपले सरकार सेवा केंद्रावर आधार प्रमाणीकरणाचे काम मोफत करून दिले जात आहे. दरम्यान, अद्यापही जिल्हयातील १२ हजार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करणे शिल्लक असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमुक्तीची रक्कम जमा झाली नाही. आधार प्रमाणीकरणासाठी शेतकऱ्यांची होणारी अडचण दुर करण्यासाठी गुरुवारपासून ता. १३ दोन दिवसीय शिबीर आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार हिंगोली येथील बँक ऑफ बडोदा, युनीयन बँक ऑफ इंडिया, भारतीय स्टेट बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक या ठिकाणी शिबीर होतील. या शिवाय कळमनुरी येथे स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बँक, डोंगकडा येथे स्टेट बँक ऑफ इंडिया तर आखाडा बाळापूर येथे स्टेट बॅँक आॅफ इंडिया या ठिकाणी बँकेच्या वेळेत शिबीर होईल. या ठिकाणी आधार प्रमाणीकरण करण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्राच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्याठिकाणी तातडीने आधार प्रमाणीकरण करता येणार आहे. शेतकऱ्यांनी या शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुपाटे यांनी केले आहे.
Source link
हिंगोलीत आधार प्रमाणीकरणासाठी दोन दिवसीय शिबीर:DDR सुरेखा फुपाटे यांची माहिती, आपले सरकार सेवा केंद्राचे कर्मचारीही उपस्थित राहणार