![]()
जळगाव जिल्ह्यातील शिवरे ग्रामपंचायतचे ग्राम पंचायत अधिकारी पी. एन. पाटील यांच्यावर ग्रामसभेत दबाव टाकल्यामुळे सोमवारी ता. 17 त्यांचा ऱ्हदयविकाराने मृ्त्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ राज्यभरात महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी संघटनेने ग्रामसभांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यातील व आगामी काळातील ग्रामसभा घेतल्या जाणार नसल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील ग्रामपंचायत शिवरे येथे कार्यरत असलेले ग्रामपंचायत अधिकारी पी.एन.पाटील यांना ग्रामसभेत काही लोकांकडून दबाव टाकण्यात आला. त्याच दरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्रझटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचा राज्य ग्रामपंचायत अधिकारी संघटनेने तिव्र निषेध नोंदवला आहे. ग्रामसभांमधून ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर विविध ठराव घेण्यासाठी दबाव टाकले जात असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे ग्रामसभा घेणे म्हणजे मोठ्या अग्नीपरिक्षेतील जावे लागत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. शिवरे येथील या घटनेच्या निषेधार्थ राज्यातील सर्व 28 हजार ग्रामपंचायतीमधून ग्रा्मसभांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय राज्य संघटनेने घेतला आहे. त्यानुसार राज्यातील सर्व जिल्हा कार्यकारीणीला या संदर्भातील माहिती देण्यात आली असून त्यानुसार जिल्हा कार्यकारीणीकडून प्रत्येक जिल्हयात ग्रामसभांवर बहिष्कार टाकण्यात आल्याचे पत्र जिल्हा परिषदेकडे सादर करण्यात आले आहे. दरम्यान, हिंगोली येथे संघटनेचे अध्यक्ष दिलीप पांढरे पाटील, सचिव राजेश किलचे, मच्छींद्र भारती यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी ता. 18 जिल्हा परिषदेकडे निवेदन सादर केले आहे. सध्या घेतल्या जात असलेल्या व नियोजन ग्रामसभांवर बहिष्कार टाकत असल्याचे या पत्रात नमुद करण्यात आले आहे. दरम्यान, राज्यभर ग्रामसभांवर बहिष्कार टाकण्यात आल्याने राज्यात ग्रामविकास आराखडे, वैयक्तिक लाभाच्या योजनांच्या लाभार्थी निवडी, विकास कामांचे ठराव मंजूर करण्याचे काम ठप्प होणार आहे.
Source link
जळगावमधील ग्रामपंचायत अधिकाऱ्याच्या मृत्यूनंतर राज्यभरात संताप:ग्रामसभांवर बहिष्काराचा संघटनेचा मोठा निर्णय