Headlines

कुंपणच शेत खातंय!:जनतेच्या घामाचा पैसा लुटतायत; कुंभमेळ्याच्या कथित गैरव्यवहारावरून नाना पटोलेंचा सरकारवर गंभीर आरोप




राज्यातील वाळूघाट, कुंभमेळ्याच्या कामांमधील कथित गैरव्यवहार आणि मतदारयादीच्या प्रक्रियेवरून काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ‘कुंपणच शेत खातंय’ अशी टीका करत सरकारच्या काळात जनतेच्या घामाचा पैसा लुटला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. नागपुरात पत्रकार परिषदेत पटोले यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राज्य सरकारवर विविध मुद्द्यांवरून निशाणा साधला. भंडाऱ्यातील वाळूघाटांच्या कथित गैरव्यवहारावरून सरकारला घेरले भंडारा जिल्ह्यातील वाळूघाटांच्या व्यवहारावरून पटोले यांनी सरकारला जाब विचारला. वाळूच्या विषयावर भाजपचेच नेते बोलत असल्याचे सांगत त्यांनी या कथित हजारो कोटींच्या प्रकरणात कोणाला पाठबळ मिळत आहे, असा सवाल उपस्थित केला. “शासनच याला जबाबदार असतं आणि शासनानेच यामध्ये भूमिका घ्यायची आहे,” असे पटोले म्हणाले. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे स्वतः भंडाऱ्याच्या शेजारील जिल्ह्यातील मंत्री असल्याने त्यांना या प्रकरणाची माहिती असल्याचा दावाही त्यांनी केला. भंडारा जिल्ह्यातील वाळूघाटांमध्ये नेमके काय घडले, याची संपूर्ण माहिती आपण महसूल मंत्र्यांना दिली असल्याचे पटोले यांनी सांगितले. त्यामुळे आता या प्रकरणात कारवाई करण्याची जबाबदारी महसूल मंत्र्यांचीच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कुंपणच शेत खातंय; सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप नाशिकमधील कुंभमेळ्याच्या तयारीसाठी सुरू असलेल्या कामांवरूनही नाना पटोले यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. “कुंपणच शेत खातंय. जनतेच्या घामाचे पैसे कसे लुटले जातात, हे पाहायला मिळत आहे,” अशा शब्दांत त्यांनी सरकारवर टीका केली. नकली किंवा संशयास्पद निविदा काढून त्यातून कामे दिली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. राज्याची तिजोरी दिवसाढवळ्या लुटली जात असल्याचे चित्र असल्याचे पटोले म्हणाले. त्यांच्या मते, नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात सरकारी निधी खर्च केला जात आहे. मात्र या पैशांचा योग्य वापर होण्याऐवजी त्यात कथित गैरव्यवहार होत असल्याचा आरोप त्यांनी केला. फडणवीस सरकारचा सहभाग; पटोलेंचा थेट आरोप कुंभमेळ्याच्या कामांमधील कथित गैरव्यवहारासाठी पटोले यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला जबाबदार धरले. “सरकारच यामध्ये सहभागी आहे, फडणवीस सरकारचा सहभाग आहे,” असा थेट आरोप त्यांनी केला. या सर्व आरोपांमधून सरकार कसे बाहेर पडणार, याकडे काँग्रेसचे लक्ष असल्याचेही पटोले म्हणाले. नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या निमित्ताने देशभरातून साधू-संत आणि भाविक येणार आहेत. त्यामुळे कुंभमेळ्याच्या तयारीतील कथित भ्रष्टाचाराची प्रकरणे त्यावेळी समोर आली, तर त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या प्रतिमेवर होईल, असा इशाराही पटोले यांनी दिला. कुंभमेळ्याच्या नावाने महाराष्ट्राची बदनामी होऊ शकते कुंभमेळा हा केवळ महाराष्ट्रासाठी नव्हे, तर देशभरातील श्रद्धेचा विषय आहे. त्यामुळे या आयोजनातील गैरव्यवहाराच्या बातम्या देशभर पोहोचल्यास महाराष्ट्राची बदनामी होऊ शकते, असा दावा पटोले यांनी केला. “देशभरातील साधू-संत जेव्हा नाशिकमध्ये येतील आणि या सर्व गोष्टींचा खुलासा होईल, तेव्हा सरकारच्या भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्राची बदनामी झाल्याचे देशाला दिसेल,” असे ते म्हणाले. कुंभमेळ्याच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर निधी खर्च होत असताना त्याचा पारदर्शक आणि योग्य वापर होणे आवश्यक असल्याची भूमिका त्यांनी मांडली. बनावट वर्गवारीवरूनही सरकारवर निशाणा कुंभमेळ्याच्या कामांसाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याशी संबंधित कथित बनावट वर्गवारीच्या प्रकरणावरही पत्रकार परिषदेत प्रश्न उपस्थित करण्यात आला. याबाबत जळगाव येथील एका छपाई केंद्रात बनावट साहित्य छापण्यात आल्याचे आणि या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याचे पटोले यांनी नमूद केले. या प्रकरणात नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या परिवारातील व्यक्तींचा संबंध असल्याचा मुद्दाही पत्रकार परिषदेत उपस्थित करण्यात आला. त्यावर पटोले यांनी राज्यातील परिस्थितीवर टीका करत सरकारी कामांमध्ये पारदर्शकता आवश्यक असल्याचे सांगितले. मतदारयादीच्या प्रक्रियेवरही पटोलेंची चिंता मतदारयादीच्या विशेष पुनरिक्षण प्रक्रियेबाबतही नाना पटोले यांनी चिंता व्यक्त केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, सुमारे दोन कोटी मतदार या प्रक्रियेतून वंचित राहिल्याचा मुद्दा समोर आला आहे. बातम्यांमधून आणि केलेल्या आढाव्यातून सुमारे १० टक्के मतदारांबाबत काही अडचणी असल्याचे लक्षात आल्याचे त्यांनी सांगितले. काही मतदार उपलब्ध नसणे, काहींचा मृत्यू झालेला असणे अशा कारणांमुळे मतदारयादीत बदल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुन्हा संधी देण्यासाठी प्रक्रिया सुरू राहणार असल्याचे त्यांनी म्हटले. मतदारयादीची अंतिम रचना तयार झाल्यानंतर त्यात मोठ्या प्रमाणावर त्रुटी आढळल्यास त्याचा फटका अनेक नागरिकांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहण्यात होऊ शकतो. त्यामुळे निवडणूक आयोगाने मतदारांना मतदानापासून वंचित राहण्याची वेळ येऊ नये, याची काळजी घ्यावी, अशी मागणी पटोले यांनी केली. हेही वाचा… नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात मोठी घडामोड:मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन, जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी (18 ऑगस्ट) महत्त्वाचा निर्णय दिला. 2013 मधील या हत्येप्रकरणी पुणे सत्र न्यायालयाने दोषी ठरवलेल्या सचिन अंदुरे याला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला असून, त्याला सुनावण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *