Headlines

नागपूरच्या 12 नामांकित शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी!:शाळा परिसरात मोठी खळबळ, खालिस्तानी संघटनेच्या नावे ई-मेल; पोलिस अलर्ट मोडवर




नागपूरमधील 12 नामांकित शाळांना मंगळवारी सकाळी ई-मेलद्वारे बॉम्बने उडवून देण्याची धमकी आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. शाळांच्या अधिकृत ई-मेल आयडीवर हा धमकीचा संदेश धडकला. मुख्याध्यापकांनी हा ई-मेल पाहिल्यानंतर तातडीने याची माहिती पोलिसांना दिली, ज्यामुळे शिक्षण क्षेत्रासह पोलिस प्रशासनातही एकच धांदल उडाली. या ई-मेलमध्ये असा आरोप करण्यात आला आहे की, या शाळा विद्यार्थ्यांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार लादत आहेत आणि याच कारणामुळे संपूर्ण शाळा बॉम्बने उडवून देण्यात येतील. धमकी आलेल्या या नामांकित शाळांमध्ये भांडेवाडीतील सेंटर पॉईंट स्कूल, तसेच अजनी, काटोल आणि वायुसेना नगर येथील काही शाळांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या शाळांसोबतच नागपूर जिल्हा न्यायालयालाही अशीच धमकी देण्यात आली आहे. पोलिसांची तातडीची कारवाई धमकीची माहिती मिळताच पोलिस यंत्रणा तात्काळ सतर्क झाली. नागपूरचे सहपोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना अलर्ट जारी केला. त्यानंतर काही वेळातच पोलिसांची पथके, बॉम्ब शोधक व नाशक पथक आणि दुपारी 12 वाजेच्या सुमारास श्वान पथकही शाळांमध्ये दाखल झाले. सुरक्षेचा उपाय म्हणून पोलिसांनी आधी शाळा परिसर रिकामा केला आणि तपासणी सुरू केली. शाळेत अचानक पोलिस आल्याने आणि सुरक्षेसाठी मोठा बंदोबस्त तैनात केल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. ही बातमी मिळताच घाबरलेल्या अनेक पालकांनी आपल्या मुलांना सुखरूप घरी नेण्यासाठी शाळांकडे धाव घेतली. खालिस्तानी संघटनेच्या नावे धमकी या प्रकरणाचा सविस्तर तपास केला असता, हे धमकीचे ई-मेल एका खालिस्तानी संघटनेच्या नावाने पाठवण्यात आले असल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत पोलिसांनी धमकी आलेल्या सर्व 12 खासगी आणि सरकारी शाळांची कसून तपासणी केली आहे. सुदैवाने, या तपासणीत कोठेही बॉम्ब किंवा कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही. त्यामुळे प्रशासनाने सुटकेचा निःश्वास टाकला असला तरी, या भयंकर धमकीमुळे पालकांमध्ये मात्र अजूनही भीतीचे आणि चिंतेचे वातावरण कायम आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *