![]()
पुणे शहराची वाढती लोकसंख्या आणि वाहतूक कोंडीच्या समस्येवर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी चिंता व्यक्त केली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर केवळ ११ टक्के असल्याने, तर्कशुद्ध वाहतूक सुधारणा आराखड्याची अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले. यामुळेच पुणेकरांना वाहतूक कोंडीतून सुटका मिळू शकेल, असे ते म्हणाले. पुणे शहराची लोकसंख्या ६० ते ६५ लाखांपर्यंत पोहोचली असून, शहर भौगोलिकदृष्ट्या वेगाने विस्तारले आहे. मात्र, शहरातील रस्ते केवळ ८ टक्क्यांपेक्षा अधिक वाढले नाहीत. सध्या शहरात केवळ १९७० बसेस धावत आहेत, ज्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यावर भर देणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे मोहोळ यांनी नमूद केले. मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, तिचा विस्तार वाढत आहे. पुढील तीन वर्षांत बसची संख्या तीन ते चार हजारांनी वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. देशात पुणे सर्वोत्तम शहर बनवण्यासाठी आवश्यक सुधारणा कराव्या लागतील. वाहतूक समस्येमुळे शहराच्या नावलौकिकाला गालबोट लागू नये, अशी भीती वाटत असल्याचेही मोहोळ यांनी सांगितले. मंगळवारी पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात आयोजित पुणे शहर वाहतूक सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त राजेंद्र बनसोडे आणि मनोज पाटील उपस्थित होते. यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, लोकांचा धोरणांमध्ये सहभाग घेऊन शहरातील वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जाईल. शहरात असलेल्या ३५ वाहतूक चौक्यांवर वाहतूक सुधारणांबाबत ४० ते ४५ जणांची समिती स्थापन करण्यात येईल. पुण्यात वाहतूक कोंडी अधिक असल्याने प्रवासाला वेळ लागतो. रस्ते अरुंद असून वाहनांची संख्या जास्त आहे. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी युद्धपातळीवर दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येत आहेत. पायाभूत सुविधांमध्ये होणाऱ्या गुंतवणुकीमुळे आगामी चार वर्षांत वाहतूक सुरळीत होईल. सध्या वाहतुकीचा वेग २२ किलोमीटर प्रतितास असून, सुधारणांनंतर तो ३३ टक्क्यांपर्यंत पोहोचेल, असे कुमार यांनी स्पष्ट केले. प्रत्येक चौकी भागातील बारकाईने अभ्यास करून सुधारणा केल्या जातील.
Source link
पुणे शहरात सार्वजनिक वाहतूक वापर फक्त 11 टक्के:केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ: कोंडी सोडवण्यासाठी तर्कशुद्ध आराखडा हवा