Headlines

देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीत जाणार?:'त्यांना तिकडे का पाठवताय…'; मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीवारीच्या चर्चांवर अमृता फडणवीसांचे मिश्किल उत्तर




राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळणार असून ते दिल्लीत जाणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही याबाबत उघडपणे भाष्य केले असून, नुकतेच भाजपाच्या केंद्रीय कार्यकारिणीत झालेले संघटनात्मक बदल आणि त्यानंतर फडणवीसांचा पार पडलेला दिल्ली दौरा यामुळे या चर्चांना अधिकच उधाण आले आहे. देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत आपली नवी राजकीय कारकीर्द सुरू करणार असल्याच्या या सर्व घडामोडींवर आणि चर्चांवर त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना विचारणा केली असता, त्यांनी यावर अत्यंत मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे. अमृता फडणवीस म्हणाल्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे सेवक आहेत. त्यांना इथे सेवा करू द्या. त्यांना का पाठवत आहात, त्यांना इथेच सेवा करू द्या. महाराष्ट्राची मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे. महाराष्ट्र हे देशातील मोठे राज्य आहे. या राज्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे, याचा मला आनंद वाटतो, त्यामुळे ते इथे राहायला हवेत, अशा भावना अमृता फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत. ‘मंथन फॉर युवा’ या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या अमृता फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध विषयांवर आपले विचार मांडले. यावेळी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेले ‘हॅकेथॉन’ आणि ‘आयडीथॉन’चे प्रदर्शन पाहून आपण थक्क झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच, विद्यार्थ्यांनी अतिशय कल्पकतेने तयार केलेले हे लोकोपयोगी प्रकल्प प्रत्यक्षात अमलात आणल्यास त्याचा संपूर्ण समाजाला मोठा फायदा होऊ शकतो, अशी आशाही अमृता फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली. काँग्रेसला स्वतःचे संविधान निर्माण करायचे आहे काँग्रेसकडून ‘वंदे मातरम’चा अवमान झाल्याच्या प्रकरणावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अमृता फडणवीस यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली. त्या म्हणाल्या की, वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत राष्ट्रगाणबरोबर गायले जावे, असा निर्णय संसदेने घेतला आहे. संसदेत कायदा झाल्यानंतर जे लोक त्याचा आदर करत नसतील त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. तसेच, काँग्रेसने आपल्या कार्यक्रमात पूर्वीचेच ‘वंदे मातरम’ वाजविण्याचा निर्णय घेतल्याबद्दल पत्रकारांनी विचारणा केली असता, त्यावर सडकून टीका करताना त्या म्हणाल्या की, काँग्रेसला आपले स्वतःचे संविधान निर्माण करायचे आहे. याच संवादादरम्यान, केरळमध्ये काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांनी तिरंग्याच्या आकाराचा केक कापल्याच्या घटनेबाबतही अमृता फडणवीस यांना त्यांचे मत विचारण्यात आले. यावर अधिक बोलणे टाळत आणि सावध भूमिका घेत त्या म्हणाल्या की, तिरंग्याच्या वापराबाबतची कायदेशीर तरतूद आपल्याला माहीत नाही. ही तरतूद पाहूनच यावर भाष्य करायला हवे. जंतर-मंतरवरील आंदोलन भरकटले दरम्यान, यावेळी जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनाबद्दल विचारले असता अमृता फडणवीस म्हणाल्या, जंतर मंतरवर आंदोलनाला सुरुवात झाली ती नीट पेपरफुटीच्या प्रश्नावर. ही सुरुवात चांगली होती. पण त्यात नंतर समाजविरोधी आणि नको असलेले घटक सामील झाले आणि त्यांनी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे आंदोलन काहीसे भरकटले. हे आंदोलन केवळ विद्यार्थ्यांच्या प्रश्नापुरतेच मर्यादित राहिले असते, तर चांगले झाले असते. आता नीटच्या बाबतीत सरकारने पावले उचलली आहेत, त्यावर कार्यवाही सुरू आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *