Headlines

पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीत दोन शहराध्यक्ष:विशाल तांबे पश्चिमचे, श्रीकांत पाटील पूर्व विभागाचे प्रमुख




राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पुणे शहरातील संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी शहराध्यक्षपदाची विभागणी केली आहे. पुणे पश्चिम विभागाच्या शहराध्यक्षपदी विशाल तांबे यांची, तर पुणे पूर्व विभागाच्या शहराध्यक्षपदी श्रीकांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी १७ ऑगस्ट २०२६ रोजी यासंदर्भातील स्वतंत्र नियुक्तीपत्रे जारी केली. पक्षासाठी आजवर दिलेल्या योगदानाची आणि केलेल्या कामाची दखल घेऊन दोन्ही नेत्यांवर शहर संघटनेची ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आल्याचे नियुक्तीपत्रात नमूद आहे. विशाल तांबे यांच्याकडे पुणे पश्चिम शहराध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या कार्यक्षेत्रात खडकवासला, हडपसर, पर्वती आणि कसबा हे चार विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत. दुसरीकडे, श्रीकांत पाटील यांची पुणे पूर्व शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या कार्यक्षेत्रात शिवाजीनगर, कोथरूड, वडगाव शेरी आणि पुणे कॅन्टोन्मेंट हे विधानसभा मतदारसंघ येतात. पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक सक्षम करणे, समाजातील विविध घटकांना पक्षाशी जोडणे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचे विचार आणि पक्षाची ध्येय-धोरणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन या नियुक्तीपत्रातून करण्यात आले आहे. पुणे शहरासाठी दोन शहराध्यक्ष नियुक्त करण्याच्या या निर्णयामुळे पक्षाच्या विभागनिहाय संघटनात्मक कामाला अधिक गती मिळण्याची शक्यता आहे. स्वतंत्र कार्यक्षेत्रामुळे स्थानिक पातळीवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बांधणी, संघटनात्मक नियुक्त्या आणि पक्षाच्या आगामी कार्यक्रमांचे नियोजन अधिक प्रभावीपणे करण्यास मदत होणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. दोन्ही शहराध्यक्षांवर आपापल्या कार्यक्षेत्रात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्याचे मोठे आव्हान असणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *