![]()
सध्या अस्तित्वात असलेल्या मतदार यादीच्या विशेष सूक्ष्म पुनरिक्षणाला (एसआयआर) पुन्हा एकदा आठवडाभराची मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे प्रारूप मतदार यादी आता २४ ऑगस्टऐवजी ३१ ऑगस्ट रोजी जाहीर केली जाईल. दरम्यान, या मुदतवाढीदरम्यानच्या कामकाजाची आणि पुढील नियोजनाची माहिती देण्यासाठी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम शुक्रवारी अमरावतीत येत आहेत. ते येथील विभागीय आयुक्त कार्यालयात अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत जिल्हाधिकारी, मतदार यादी निरीक्षक आणि अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी उपस्थित राहतील. सभागृह क्रमांक एकमध्ये ही बैठक होईल. राज्यात सध्या नवीन मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. जुन्या यादीतील मृत आणि दुबार मतदारांची नावे वगळणे तसेच स्थलांतरित मतदारांची नावे संबंधित मतदारसंघात समाविष्ट करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. हे काम नियोजित वेळेत पूर्ण न झाल्याने ‘एसआयआर’ला यापूर्वीही मुदतवाढ मिळाली होती. सर्व मतदारांच्या नावांचे डिजिटायझेशनचे काम पूर्ण न झाल्यामुळे प्रारूप यादी नियोजित वेळेत जाहीर करणे शक्य नव्हते. त्यामुळे आणखी एकदा आठवडाभराची मुदतवाढ देण्यात आली आहे. आता ३१ ऑगस्टला प्रारूप यादी जाहीर होईल. या मुदतवाढीच्या काळात डिजिटायझेशनचे काम कसे पुढे न्यायचे आणि प्रारूप यादीवर प्राप्त होणाऱ्या सूचना व हरकतींची सोडवणूक कशी करायची, याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी एस. चोक्कलिंगम अमरावतीत येत आहेत. ते शुक्रवारी सकाळी नागपूर विभागाची बैठक आटोपून दुपारी ४ वाजता अमरावतीत पोहोचतील आणि बैठक संपल्यानंतर रात्री रेल्वेने मुंबईकडे रवाना होतील. त्यांच्या दौरा कार्यक्रमानुसार, २५ ऑगस्टला ते पुणे व कोकण विभागाची, तर २७ ऑगस्टला नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर विभागाची बैठक घेणार आहेत.
Source link
'एसआयआर'ला पुन्हा मुदतवाढ:मुख्य निवडणूक अधिकारी अमरावतीत: विभागीय आयुक्तालयात शुक्रवारी बैठक