![]()
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर मराठा क्रांती मोर्चाने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. 9 सप्टेंबरपासून मराठा आरक्षणासाठी टप्प्याटप्प्याने आंदोलन तीव्र करण्यात येणार असून, सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यभर रस्त्यावर उतरू, असा स्पष्ट इशारा मोर्चाच्या समन्वयकांनी आज शनिवारी 22 ऑगस्ट रोजी झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत दिला. मराठा क्रांती मोर्चाने प्रसिद्ध केलेल्या 11 ठरावांमध्ये आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट करण्यात आली आहे. समाजाच्या एकजुटीवर भर देत सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, युवक, महिला आणि विविध घटकांनी एकत्रितपणे आरक्षणाच्या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. हा संघर्ष केवळ आरक्षणापुरता मर्यादित नसून समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. महिलाची बदनामी थांबवावी मोर्चाने सोशल मीडियावरील आरोप-प्रत्यारोप, वैयक्तिक टीका आणि महिलांबाबत होणारी बदनामी थांबवण्याचे आवाहन केले आहे. आंदोलनाच्या नावाखाली कोणत्याही प्रकारचा हिंसाचार, सरकारी मालमत्तेचे नुकसान किंवा समाजात तेढ निर्माण करणारी कृत्ये स्वीकारली जाणार नाहीत, अशी भूमिकाही जाहीर करण्यात आली. जरांगे यांच्या भूमिकेला पाठिंबा पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला पाठिंबा कायम असल्याचे स्पष्ट करण्यात आले. आरक्षणाच्या लढ्यातील निर्णय सामूहिक चर्चेनंतरच घेतले जातील आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन समाजबांधवांना करण्यात आले. मराठा समाजाला संविधानिक चौकटीत टिकाऊ आरक्षण मिळावे, आरक्षणातील अडथळे दूर करावेत आणि शिक्षण, रोजगार व सामाजिक न्यायासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही मोर्चाने सरकारकडे केली आहे. मराठा क्रांती मोर्चाचा संदेश स्पष्ट आंदोलन समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी आहे. राजकीय मतभेद विसरून मराठा समाजाने एकजुटीने उभे राहावे आणि आरक्षणासाठी शांततामय पण निर्णायक लढा द्यावा. पत्रकार परिषदेशा मराठी क्रांती मोर्चाचे समन्वयक योगेश शेळके-धामोरीकर, सुनील कोटकर-पाटील, डॉ. शिवानंद भानुसे, विनोद काकडे-पाटील, लक्ष्मणबापू शिरसाठ, माणिकराव शिंदे-पाटील उपस्थित होते. (ही बातमी अपडेट होत आहे…)
Source link
मराठा क्रांती मोर्चा पुन्हा आक्रमक:आरक्षणासाठी 9 सप्टेंबरपासून राज्यव्यापी लढा; राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याचे आवाहन