Headlines

शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर:महेंद्र दळवींनी सुनील तटकरेंना सुनावले; म्हणाले- त्यांच्या पक्षाला आम्ही गणतीतही धरत नाही




रायगड जिल्ह्यात महायुतीचे सरकार सत्तेत असले तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. अलिबागचे शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका करत नव्या वादाला तोंड फोडले आहे. पत्रकारांशी बोलताना दळवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा कायम अडथळे निर्माण करणारा पक्ष असल्याचे सांगत, त्यांच्या पक्षाला आम्ही गणतीत धरत नसल्याचे वक्तव्य केले. भाजप आणि शिवसेनेचे विचार अनेक बाबतीत समान असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. रायगड लोकसभा मतदारसंघात आगामी काळात शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा निर्धार व्यक्त करत, या लढाईसाठी एक नव्हे तर चार जण तयार असल्याचे त्यांनी सांगितले. तटकरे कुटुंबाला भविष्यात मोठा राजकीय धक्का बसणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. रायगडच्या पालकमंत्रीपदावरूनही दळवी यांनी सुनील तटकरे यांना लक्ष्य केले. भरत गोगावले यांची पालकमंत्री म्हणून निवड झाल्यानंतर शिवसैनिकांनी जल्लोष केला होता. मात्र, गोगावले यांना पालकमंत्री करण्यासाठी आपलाही पुढाकार असल्याचे तटकरे यांनी अलिबागमधील पत्रकार परिषदेत म्हटले होते. यावर दळवी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पालकमंत्रीपदाच्या निर्णयाचे श्रेय तटकरेंनी घेऊ नये, त्यांनी आधी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे, असे दळवी म्हणाले. भरत गोगावले हे सामान्य जनतेतून पुढे आलेले कार्यकर्ते आणि नेते असून रायगडमध्ये शिवसेनेचा जनाधार मोठा आहे. त्यामुळे पालकमंत्रीपद मिळणे हा शिवसेनेचा अधिकार होता आणि तो अधिकार पक्षाला मिळाला, असा दावा त्यांनी केला. भरत गोगावले यांना सुनील तटकरे यांनी अद्याप शुभेच्छा दिलेल्या नसल्याबाबतही दळवींना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी तटकरेंच्या शुभेच्छांची आम्हाला कोणतीही अपेक्षा नसल्याचे स्पष्ट केले. दुसऱ्यांच्या कार्यक्रमांमध्ये अडथळे आणण्याची तटकरेंची भूमिका असल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, महेंद्र दळवी यांनी स्वतःच्या मंत्रिपदाच्या इच्छेबाबतही स्पष्ट भूमिका मांडली. पक्षाच्या अडचणीच्या काळात साथ देणाऱ्या पहिल्या फळीतील आमदारांमध्ये आपला समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या भरत गोगावले यांच्या रूपाने पक्षाने रायगडला एक मंत्री दिला आहे. मात्र, आपल्या कार्यकर्त्यांचीही आपल्याला मंत्रिपद मिळावे अशी इच्छा असून आपण स्वतःदेखील त्याबाबत आशावादी असल्याचे दळवी यांनी नमूद केले. येत्या काळात पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व आपल्या नावाचा नक्की विचार करेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्षाला जुना इतिहास रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्षाला जुना इतिहास आहे. आता महेंद्र दळवी यांच्या वक्तव्यामुळे या वादाला पुन्हा धार आली आहे. राष्ट्रवादीला गणतीत न धरण्यापासून तटकरे कुटुंबाला राजकीय धक्का देण्याच्या इशाऱ्यापर्यंत दळवींनी केलेली वक्तव्ये आगामी राजकीय लढतीची दिशा दाखवणारी ठरू शकतात. त्यातच रायगड लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा निर्धार आणि मंत्रिपदाबाबत व्यक्त केलेली अपेक्षा यामुळे दळवींची भूमिका चर्चेचा विषय बनली आहे. त्यामुळे आगामी काळात तटकरे यांच्याकडून या आरोपांना काय उत्तर दिले जाते आणि महायुतीतील स्थानिक राजकारण कोणते वळण घेते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष राहणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *