Headlines

अमरावतीत आणखी एका तलाठ्याचे निलंबन:अहिल्याबाई होळकर योजनेबाबत दिशाभूल केल्याचा आरोप, इतर दोघांवरही कारवाईची शक्यता




जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी आणखी एका तलाठ्याचे निलंबन केले आहे. दर्यापूर तालुक्यातील पेठ इतबारपूर येथील विश्वनाथ गोंडाणे असे निलंबित तलाठ्याचे नाव आहे. राज्य शासनाच्या अहिल्याबाई होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत आक्षेपार्ह माहिती पसरवून शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. जिल्हाधिकारी येरेकर यांनी शुक्रवारी त्यांच्या निलंबनाचा आदेश बजावला. गेल्या दोन दिवसांतील तलाठ्याच्या निलंबनाची ही दुसरी कारवाई आहे. गोंडाणे यांच्यावर यापूर्वीही कर्तव्यात कसूर केल्याच्या तक्रारी होत्या. वरिष्ठांचे आदेश न मानणे, नागरिकांना वेळेत सेवा न देणे, तसेच सात-बारा आणि फेरफार प्रकरणांमध्ये विलंब करणे असे अनेक प्रमाद त्यांच्याकडून घडले होते. या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. निलंबन काळात त्यांचे मुख्यालय धारणी येथे निश्चित करण्यात आले असून, तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही, असे निलंबन आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. यापूर्वी अजय रामधरसिंग चव्हाण या तलाठ्याला निलंबित करण्यात आले होते. चव्हाण यांच्याकडे अमरावती शहरातील शेगाव, गंभीरपूर, तारखेडा, अकोली आणि वडगाव (नांदगाव पेठ) या साझांची जबाबदारी होती. विविध फेरफार प्रकरणांमध्ये आवश्यक दस्तऐवज ऑनलाईन अपलोड न करणे, तसेच सक्षम प्राधिकाऱ्यांचे आदेश किंवा आवश्यक आधार नसतानाही चुकीच्या नोंदी घेणे, असे त्यांच्यावरील आरोप चौकशी समितीच्या अहवालातून स्पष्ट झाले होते. दरम्यान, महसूल प्रशासनाने कर्तव्यकठोर भूमिका घेतली आहे. सततच्या गैरहजेरीमुळे अश्विनी किसन येळे या तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) महिलेला बडतर्फ करण्यात आले आहे. सूरज चव्हाण यांनाही निलंबित करण्यात आले आहे. जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणात अमरावतीचे मंडळ अधिकारी यशवंत मधुकर चतुर आणि तलाठी स्मिता अनंत लोखंडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांच्या उत्तरांवरून पुढील कारवाई निश्चित केली जाईल. याच प्रकरणात अमरावतीच्या नायब तहसीलदार टिना चव्हाण यांना यापूर्वीच निलंबित करण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *