Headlines

9 हजार 605 कोटींचा हिशोब कोण देणार?:हजारो कोटींच्या नुकसानीची जबाबदारी कोण घेणार? लाडकी बहीण योजनेवरून जयंत पाटलांचा सवाल




राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका पोस्टद्वारे दिलेल्या माहितीनुसार, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत जून 2026 पर्यंत तब्बल 92 लाख अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यात 9,605 कोटी रुपये वितरित झाल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तसेच 9,605 कोटींचा हिशोब कोण देणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. जयंत पाटील यांनी ट्विट करत म्हटले की, आरटीआयमधून समोर आलेली माहिती धक्कादायक आहे. जून 2026 पर्यंत तब्बल 92 लाख अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यात 9,605 कोटी रुपये वितरित झाल्याचे समोर आले आहे. ई-केवायसी न करणे, उत्पन्न मर्यादा ओलांडणे, सरकारी कर्मचारी असणे किंवा एकाच कुटुंबातून अनेक अर्ज असणे अशी अपात्रतेची कारणे असताना हे पैसे खात्यात जमा होईपर्यंत प्रशासन झोपले होते का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच पुढे जयंत पाटील म्हणाले, योजना लागू करण्यापूर्वी छाननी का झाली नाही? अपात्र लाभार्थ्यांना सरसकट हप्ते का दिले गेले? आणि या हजारो कोटींच्या नुकसानीची जबाबदारी कोण घेणार? लाडकी बहिणींच्या नावाखाली पैशाचा अपहार झाला का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. गरजू महिलांना मदत मिळायलाच हवी. पण जनतेच्या पैशांचा असा निष्काळजीपणे वापर समर्थनीय नाही. सरकारने या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून, अपात्र लाभार्थ्यांना झालेले वितरण कसे झाले याचा हिशोब जनतेसमोर मांडावा आणि प्रत्येक स्तरावरील दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे. ई-केवायसीमुळे ‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांत मोठी घट माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी मिळवलेल्या माहितीनुसार, राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत राबवण्यात आलेल्या सखोल पडताळणी आणि ई-केवायसी (e-KYC) मोहिमेनंतर सक्रिय लाभार्थी महिलांची संख्या 2.48 कोटींवरून थेट घसरून 1.65 कोटींवर आली आहे. लाभार्थ्यांचा हा आकडा आता स्थिरावल्यामुळे या योजनेचा राज्याच्या तिजोरीवरील दरमहा आर्थिक भार 2,484.92 कोटी रुपये, तर वार्षिक खर्च तब्बल 29,819.10 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मात्र, ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण न होऊ शकल्याने दुर्गम भागातील अनेक गरीब आणि गरजू महिला अद्यापही या महत्त्वपूर्ण योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्याचा दावा घाडगे यांनी केला आहे. पात्र लाडक्या बहिणींना जुलैच्या हप्त्याची प्रतीक्षा ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या जुलै महिन्यातील हप्त्याच्या वितरणाचा मार्ग मोकळा झाला असून, त्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून महिला व बालविकास विभागाकडे 344 कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. या निधीच्या उपलब्धतेमुळे येत्या काही दिवसांतच प्रत्यक्ष वितरणाची प्रक्रिया सुरू होण्याची दाट शक्यता असल्याने, आता राज्य सरकारकडून जुलैचा हा हप्ता आपल्या बँक खात्यात नेमका कधी जमा केला जाईल, याकडे सर्व लाभार्थी महिलांचे डोळे लागून राहिले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *