![]()
श्रीक्षेत्र गोदावरी सरला बेटाचे योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज यांनी सुरू केलेल्या आणि वारकरी संप्रदायाचा महाकुंभमेळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या १७९ व्या अखंड हरिनाम सप्ताहात रविवारी धनगरवाडी येथे भक्तीबरोबरच सामाजिक प्रबोधनाचा अनोखा जागर झाला. महंत रामगिरीजी महाराज यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत तब्बल २ लाख ७५ हजार भाविकांनी दोन्ही हात उंचावून व्यसनांपासून दूर राहण्याचा, मोबाईलचा अतिवापर टाळण्याचा आणि शाकाहारी-सदाचारी जीवन स्वीकारण्याचा सामूहिक संकल्प केला. लाखोंच्या जनसमुदायाने एकाचवेळी उंचावलेले हात या सोहळ्याचे लक्षवेधी दृश्य ठरले. प्रवचनातून महंत रामगिरीजी महाराज यांनी व्यसनमुक्ती, आहार, भक्ती आणि देशप्रेमावर भाष्य केले. सरकारचा व्यसनमुक्तीचा निर्णय स्तुत्य असला तरी केवळ कायदे करून समाज व्यसनमुक्त होणार नाही, त्यासाठी प्रत्येकाने अंतःकरणातून संकल्प करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. दारू, बीडी, सिगारेटसह सध्याच्या काळात मोबाईलचा अतिवापर हेही गंभीर व्यसन बनत असल्याचे सांगत त्यांनी विशेषतः तरुणांना त्यापासून सावध राहण्याचे आवाहन केले. मानवी आहारावर भाष्य करताना त्यांनी शाकाहाराचा पुरस्कार केला. मानवी शरीररचना शाकाहाराला पूरक असल्याचे सांगत मांसाहारापासून दूर राहण्याचे आवाहन त्यांनी केले. भक्ती ही दिखाऊ अथवा स्वार्थी नसून अंतःकरणातून निर्माण झाली पाहिजे. मासा जसा पाण्याशिवाय राहू शकत नाही, तसाच खरा भक्त भगवंताशिवाय राहू शकत नाही, असे सांगत त्यांनी निष्पाप भाव आणि निस्सीम भक्तीचे महत्त्व अधोरेखित केले. देशाच्या सीमेवर प्रतिकूल परिस्थितीत कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांच्या त्यागाचाही त्यांनी गौरव केला. सैनिक जागे आहेत म्हणून आपण सुरक्षित असल्याचे सांगत व्यासपीठावरून वीर जवानांना अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब मस्के, माजी अर्थ व बांधकाम सभापती संतोष पाटील जाधव, हरिशरणगिरीजी महाराज, संदीपान महाराज, विश्वनाथगिरी महाराज, योगानंद महाराज, मधुसूदनगिरी महाराज, बाळासाहेब महाराज रंजाळे, नवनाथ महाराज मस्के, विक्रम महाराज, साई महाराज व सरला बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. लाखो भाविकांनी घेतला आमटी-भाकरीचा महाप्रसाद धनगरवाडीतील सप्ताहस्थळी रविवारी अक्षरशः भाविकांचा महासागर उसळला. आयोजकांकडून करण्यात आलेल्या नियोजनातून सुमारे लाखो भाविकांनी आमटी-भाकरीचा महाप्रसाद घेतल्याचे सांगण्यात आले. महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या वारकऱ्यांमुळे संपूर्ण परिसर टाळ-मृदंग, हरिनाम आणि जयघोषाने दुमदुमून गेला. एवढ्या प्रचंड गर्दीतही स्वयंसेवकांकडून महाप्रसादासाठी सेवा सुरू होती.
Source link
व्यसनमुक्ती हाच जीवनाचा श्रेष्ठ धर्म- रामगिरीजी महाराज:धनगरवाडी येथील अखंड हरिनाम सप्ताहात 2 लाख 75 हजार भाविकांनी घेतली सामूहिक शपथ