![]()
पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यातील काही भागांत आगामी काळात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांत इतर भागांच्या तुलनेत अधिक पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर ओसरल्याचे चित्र आहे. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. विशेषतः मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. अशातच बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणाली सक्रिय झाल्याने राज्यात पुन्हा पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यातील काही भागांत मुसळधार, तर काही ठिकाणी वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, मंगळवारपर्यंत (25ऑगस्ट) राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे.
घाटमाथ्यासह विदर्भाला पावसाचा दिलासा अडीच महिन्यांचा कालावधी उलटून गेला असतानाही राज्यातील अनेक भागांत अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. काही भागांत पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाचा खंड कायम राहिल्यास आगामी काळात पिण्याच्या पाण्यासोबतच शेतीसाठी लागणारे पाणी, जनावरांसाठी पाणी आणि चाऱ्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः पावसावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असलेल्या भागांमध्ये परिस्थितीकडे लक्ष लागले आहे. अशातच हवामान विभागाने राज्यासाठी काहीसा दिलासा देणारा अंदाज व्यक्त केला आहे. आज, २४ ऑगस्ट रोजी देशातील अनेक भागांत मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता असून, उत्तर-पश्चिम भारतातील उत्तराखंड तसेच पूर्व उत्तर प्रदेशात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. देशातील काही राज्यांमध्ये मुसळधार पावसासह मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रातही पुढील काही दिवस पावसाची स्थिती काही भागांत सुधारण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भात २४ ऑगस्टला जोरदार पावसाची शक्यता असून त्यानंतर काही ठिकाणी पावसाचा जोर कमी होऊ शकतो. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्याच्या भागातही पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे.
राज्यात कुठे पडणार पावसाच्या सरी? राज्यातील अनेक भागांत सध्या पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने राज्यातील ७ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच मराठवाडा आणि पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रातही काही भागांत पावसाची शक्यता असून, राज्यातील उर्वरित भागांत हलक्या सरी बरसण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २४ ऑगस्ट रोजी कोकण-गोवा परिसरातील बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील विविध भागांत पुन्हा पावसाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता असून, नागरिकांसह शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या अंदाजानुसार योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. हेही वाचा… नागपूरच्या गोधनी जलशुद्धीकरण केंद्रात क्लोरिन गॅस गळती:40 जण रुग्णालयात दाखल, 4 ते 5 जणांची प्रकृती गंभीर; 12 जणांना डिस्चार्ज नागपूरच्या गोधनी ग्रामपंचायत परिसरातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या प्लांटमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास क्लोरिन गॅसची गळती झाल्याने खळबळ उडाली आहे. या गॅसच्या संपर्कात आल्याने 40 हून अधिक नागरिकांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास झाला असून, 15 पेक्षा अधिक जणांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सविस्तर वाचा..
Source link
पावसाच्या दडीनंतर राज्यात पुन्हा ‘वरुणराजा’ची कृपा:विदर्भ अन् पुणे, साताऱ्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा इशारा