Headlines

नागपूरमध्ये क्लोरिन गॅसगळती:40 जण रुग्णालयात, 4 ते 5 जणांची प्रकृती गंभीर




नागपूरच्या गोधनी ग्रामपंचायत परिसरातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या प्लांटमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास क्लोरिन गॅसची गळती झाल्याने खळबळ उडाली आहे. या गॅसच्या संपर्कात आल्याने 40 हून अधिक नागरिकांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास झाला असून, 15 पेक्षा अधिक जणांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्लांटच्या 200 मीटर परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून, एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू आहे.
नेमकी कशामुळे झाली वायुगळती? दरम्यान, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलशुद्धीकरण केंद्रात क्लोरिन गॅसची गळती नेमकी कुठून आणि कशामुळे झाली, याचा तपास सध्या आपत्ती व्यवस्थापन पथक आणि तांत्रिक अधिकाऱ्यांकडून सुरू आहे. जलशुद्धीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या क्लोरिनच्या साठवणूक व्यवस्थेत काही तांत्रिक बिघाड झाला होता का, तसेच टँकरमधून गॅसची गळती झाली का, या दोन्ही शक्यतांचा तपास केला जात आहे. गॅस गळतीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, तांत्रिक तपास पूर्ण झाल्यानंतरच त्याबाबत अधिकृत माहिती समोर येणार आहे. दरम्यान, पोलिसांकडूनही घटनास्थळाची पाहणी करून संबंधित बाबींची चौकशी केली जात आहे. 40 जण रुग्णालयात दाखल; 12 जणांना उपचारानंतर डिस्चार्ज मध्यरात्री अंदाजे 12:15 वाजण्याच्या सुमारास जलशुद्धीकरण केंद्रात गॅस गळती सुरू झाली. हवेत गॅस पसरताच परिसरातील नागरिकांना अचानक दम लागणे, डोळ्यांची जळजळ होणे आणि खोकल्याचा त्रास जाणवू लागला. या घटनेत बाधित झालेल्या 40 नागरिकांना तातडीने जवळच्या शासकीय आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी 12 जणांची प्रकृती उपचारानंतर सुधारल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर उर्वरित 28 जणांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 4 ते 5 नागरिकांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात (ICU) हलवण्यात आले आहे. काही बालके आणि ज्येष्ठ नागरिकांचाही बाधितांमध्ये समावेश असल्याची माहिती आहे. दरम्यान, रुग्णालयात दाखल असलेल्या सर्वांची प्रकृती सध्या धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. रात्रीपासून NDRF आणि पोलिसांचे रेस्क्यू ऑपरेशन सुरू घटनेची माहिती मिळताच नागपूर पोलीस, अग्निशमन दल आणि NDRFच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रात्रीपासूनच परिसरात रेस्क्यू ऑपरेशन राबवून बाधित नागरिकांना सुरक्षितपणे रुग्णालयात हलवण्यात आले, तर खबरदारीचा उपाय म्हणून इतर नागरिकांनाही सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. गॅस निष्प्रभ करण्यासाठी NDRFच्या जवानांनी विशेष सुरक्षा पोशाख आणि PPE किट परिधान करून 3 ते 4 वेळा जलशुद्धीकरण केंद्राच्या आत प्रवेश केला. गॅस गळतीचा स्रोत शोधून ती रोखण्यासोबतच परिसरातील गॅसचा प्रभाव कमी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. पोलिसांचे नागरिकांना आवाहन नागपूर शहरातील गॅसगळतीच्या घटनेनंतर परिस्थितीवर सध्या नियंत्रण मिळवण्यात आले असले, तरी नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नागपूर शहर पोलिसांनी महत्त्वाचे आवाहन केले आहे. फागो पाटील ले-आऊट आणि नागमंदिर टेकडी परिसरातील 200 मीटरचा भाग प्रतिबंधित करण्यात आला असून, नागरिकांनी या परिसरात प्रवेश करू नये, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. सुरक्षेच्या उपाययोजना म्हणून सकाळी 11 वाजेपर्यंत नागरिकांनी या 200 मीटरच्या परिसरात जाणे पूर्णपणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. परिसरात गॅसचा प्रभाव पूर्णपणे संपेपर्यंत नागरिकांनी अनावश्यकपणे घराबाहेर पडणे टाळावे आणि सुरक्षित अंतर राखावे. दरम्यान, गॅसगळतीनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. कोणत्याही प्रकारच्या अफवा किंवा अपुऱ्या माहितीकडे दुर्लक्ष करावे आणि परिस्थितीबाबतची माहिती केवळ पोलिस, प्रशासन किंवा अधिकृत यंत्रणांकडून मिळणाऱ्या माहितीनुसारच घ्यावी. नागरिकांनी प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करण्याचा प्रयत्न करू नये. आपत्कालीन परिस्थितीत प्रशासन आणि बचाव पथकांना सहकार्य करावे. परिसरातील गॅसचा प्रभाव पूर्णपणे कमी होईपर्यंत योग्य ती खबरदारी बाळगून प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन नागपूर शहर पोलिसांनी केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *