![]()
बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे विदारक सत्य समोर आणणारी एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील ग्रामीण रुग्णालयापासून अवघ्या ५० ते १०० मीटर अंतरावर एका गर्भवती महिलेची चक्क रस्त्यावरच प्रसूती झाली. धक्कादायक बाब म्हणजे, महिला रस्त्यावर वेदनांनी तडफडत असताना तिला मदत करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयातील ‘स्टाफ नर्स’ने (परिचारिका) येण्यास नकार दिल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. अखेर एका खासगी रुग्णालयातील नर्सच्या मदतीने या महिलेची सुखरूप प्रसूती करण्यात आली. नेमके काय घडले? मेहकर येथे एका महिलेला आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास अचानक तीव्र प्रसूती कळा सुरू झाल्या. महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी घरात कोणीही पुरुष मंडळी उपस्थित नव्हती. त्यामुळे ती महिला स्वतः चालत जाण्याचा प्रयत्न करत असतानाच, वेदना असह्य झाल्याने ती रस्त्यावरील एका ओट्यावर कोसळली. यावेळी बाळाचा काही भाग बाहेर आल्याने परिस्थिती अत्यंत गंभीर झाली होती. शासकीय रुग्णालयाचा मदतीस नकार हा गंभीर प्रकार योगेश सौभागे यांच्या निदर्शनास आल्यानंतर, त्यांनी तातडीने जवळच असलेल्या ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. तिथे कर्तव्यावर असलेल्या स्टाफ नर्सला त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य समजावून सांगत त्वरित घटनास्थळी येण्याची विनंती केली. मात्र, “रुग्णालयात सध्या डॉक्टर नाहीत, मी एकटीच आहे, त्यामुळे मला रुग्णालयाच्या बाहेर येता येणार नाही,” असे उडवाउडवीचे उत्तर देत नर्सने मदतीस नकार दिला. सौभागे यांनी पुन्हा विनंती करत, “महिलेचे बाळ अर्धे बाहेर आले आहे, आम्हाला काय करावे सुचत नाहीये, कृपया तुम्ही सोबत चला,” अशी विनंती केली, तरीही शासकीय यंत्रणेने पाठ फिरवली. खासगी नर्स धावून आली शासकीय रुग्णालयाकडून मदत मिळत नसल्याचे पाहून सौभागे यांनी क्षणाचाही विलंब न करता प्रसंगावधान राखले. त्यांनी तात्काळ एका खासगी रुग्णालयातील नर्सशी संपर्क साधून तिला बोलावून घेतले. या खासगी नर्सने सौभागे कुटुंबातील महिलांच्या मदतीने अत्यंत कौशल्याने त्या महिलेची रस्त्यावरच यशस्वी प्रसूती केली. सुदैवाने बाळ आणि बाळंतीण दोघेही सुखरूप आहेत. प्रसूतीनंतर त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेमुळे मेहकर परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, ऐनवेळी रुग्णांना वाऱ्यावर सोडणाऱ्या शासकीय रुग्णालयातील बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. हेही वाचा.. संभाजीनगरातील खवड्या डोंगराच्या घटनेनंतर शहरात पुन्हा थरार!: घरातील वादातून तरुण चढला टॉवरवर; पोलिस-अग्निशमन दलाच्या प्रयत्नांनी टळला अनर्थ छत्रपती संभाजीनगर शहरातील खवड्या डोंगरावर एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याची मन सुन्न करणारी घटना ताजी असतानाच, शहरात आणखी एक मोठी दुर्घटना टळली आहे. हर्सूल-सावंगी परिसरात एका तरुणाने घरातील वादातून थेट एका उंच टॉवरवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिस आणि अग्निशमन दलाने दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि तासभर चाललेल्या थरारक रेस्क्यू ऑपरेशननंतर या तरुणाला सुखरूप खाली उतरवण्यात यश आले आहे. या संपूर्ण घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओही आता समोर आला आहे. सविस्तर वाचा
Source link
बुलडाण्यात महिलेची रस्त्यावरच प्रसूती:ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्याने मदतीस नकार दिल्याचा आरोप, खासगी नर्सच्या मदतीने टळला अनर्थ