![]()
हिंगोली जिल्हयात ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर संघटनेने सुरु केलेले असहकार आंदोलन बुधवारी ता. 26 सलग सातव्या दिवशीही सुरुच आहे. पंचायत विभागाच्या उपमुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे संघटनेतून तीव्र संताप व्यक्त होत असून आता आंदोलनाची धार अधिक तीव्र करण्याच्या हालाचाली सुरु झाल्या आहेत. हिंगोली जिल्हयातील ग्राम पंचायत अधिकाऱ्यांचे चुकीच्या पध्दतीने केलेले निलंबन रद्द करावे, वेतनवाढ रोखण्याची कारवाई रद्द करावी, निवानी व पुरावे नसलेल्या तक्रारदारांच्या तक्रारीची दखल घेऊ नये, अतिरिक्त ग्रामपंचायतचा पदभार असलेल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना अतिरिक्त मानधन द्यावे, विभागीय चौकशीमध्ये आलेल्या निर्णयावर सौम्य शिक्षा द्यावी, पात्र कर्मचाऱ्यांचे गोपनिय अहवाल देण्यात यावे, सन 2022-23 ते सन 2025-26 पर्यंतचे रखडलेले आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरीत करावे, कालबध्द पदोन्नतीचा लाभ द्यावा यासह इतर मागण्या मांडण्यात आल्या. या मागण्यांबाबत प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हयातील 250 ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी गुरुवारपासून ता. 20 असहकार आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात प्रशासनाला तसेच शासनाने मागितलेली माहिती देण्यास नकार दिला जात आहे. गावकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी गाव पातळीवर कामे केली जात असली तरी शासन व जिल्हा परिषदेकडून मागविण्यात आलेली माहिती देण्यास नकार दिला जात आहे. दरम्यान, मागील सात दिवसांपासून आंदोलन सुरु असतांना पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मागण्या जाणून घेतल्या नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.या प्रकारामुळे संघटनेतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. यापुढील काळात आंदोलनाची धार अधिक तीव्र करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. यामध्ये वेळप्रसंगी ग्रामपंचातीच्या चाव्या व शिक्के उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे जमा करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.या प्रकरणी उपमुख्य कार्यकारी अधिकारी केशव गड्डापोड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
Source link
हिंगोलीत 250 ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे सातव्या दिवशीही असहकार आंदोलन सुरू:विभाग प्रमुखांच्या दुर्लक्षामुळे तीव्र संताप, आंदोलन तीव्र करण्याच्या हालचाली