![]()
नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापूरच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पर्यटन आणि धार्मिक भेटीसाठी काठमांडू येथे गेलेल्या नागपूर जिल्ह्यातील ‘श्री. स्वामी महाराज’ यांच्या समूहातील सुमारे ११० नागरिक पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली आहे. हे सर्व नागरिक आता मायदेशी परतत असून, प्रशासनाकडून त्यांच्या परतीसाठी योग्य ते नियोजन करण्यात आले आहे. २२ ऑगस्टला नेपाळला झाले होते रवाना हा ११० नागरिकांचा समूह २२ ऑगस्ट रोजी नेपाळला रवाना झाला होता. यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. २६ ऑगस्ट रोजी नेपाळमध्ये अचानक महापूराची घटना घडली. मात्र, या नैसर्गिक आपत्तीचा या समूहातील नागरिकांवर कोणताही प्रतिकूल परिणाम झाला नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. हे सर्व नागरिक काठमांडू येथील माहेश्वरी समाजाच्या ठिकाणी सुरक्षितपणे थांबले होते. वर्ध्यातील ४ नागरिकांचा समावेश या समूहामध्ये वर्धा जिल्ह्यातील चार नागरिकांचा समावेश आहे. यामध्ये दिपक पांडे (रा. वाघसावली, हिंगणघाट), तसेच इंदिरा चौधरी, वर्षा उपाध्याय आणि सुलोचना थापरे (रा. चारमंडळ, सेलू) यांचा समावेश आहे. वर्धा जिल्हा नियंत्रण कक्षाकडून या नागरिकांशी सातत्याने संपर्क साधला जात असून त्यांच्या सद्यस्थितीची नियमित माहिती घेतली जात आहे. प्रशासनाने त्यांच्या नातेवाईकांशीही संपर्क साधला असून सर्व नागरिक सुरक्षित असल्याचे स्पष्ट केल्याने नातेवाईकांचा जीव भांड्यात पडला आहे. असा असेल परतीचा प्रवास नागरिकांच्या सुरक्षित परतीसाठी नेपाळ प्रशासनाने चार बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. हे सर्व नागरिक जनकपूर बॉर्डरमार्गे भारतात दाखल होतील. त्यानंतर दानापूर (पाटणा) येथून २८ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता ते नागपूरकडे रवाना होतील. मिळालेल्या माहितीनुसार, २९ ऑगस्ट रोजी हा समूह नागपूर येथे पोहोचेल. फ्लॅश फ्लडच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून, सर्व नागरिकांना सुखरूपपणे नागपूरपर्यंत परत आणण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य तो समन्वय साधला जात आहे. नेपाळच्या पुरात अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांशी फडणवीसांचा व्हिडिओ कॉलवरून संवाद नेपाळमध्ये पुराच्या परिस्थितीत अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत त्यांच्या परिस्थितीची माहिती घेतली. “घाबरू नका, शासन तुमच्यासोबत आहे,” असा धीर देत पर्यटकांना सुरक्षितपणे महाराष्ट्रात परत आणण्यासाठी प्रशासनाला आवश्यक निर्देश दिले. त्यांच्या सुरक्षित परतीसाठी परराष्ट्र मंत्रालयाशीही पाठपुरावा सुरू असून, नेपाळचे खासदार संदीप राणा यांच्याशीही फडणवीस यांनी चर्चा केली. महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत त्यांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. हेही वाचा.. नेपाळमध्ये आणखी एका पुराचा इशारा:सीमेपासून 18 किमीवर तलाव बनला; 359 मृतदेह सापडले, 288 भारतीयांसह 1500 बेपत्ता नेपाळमध्ये बुधवारी आलेल्या विनाशकारी पुराच्या पार्श्वभूमीवर, चीनने भोटेकोशी नदीत पुन्हा एकदा मोठ्या पुराचा इशारा दिला आहे. चीनकडून मिळालेल्या माहितीनुसार, रसुवागढी सीमेपासून सुमारे १८ किलोमीटर वरच्या बाजूस ल्हेंडे नदीत पाणी साचल्यामुळे एक तलाव तयार झाला आहे. प्रशासनाने सखल भागातील लोकांना नदीकिनारीून दूर जाण्याचा सल्ला दिला आहे. जर हा तलाव फुटला, तर भोटेकोशी नदीला पुन्हा एकदा भीषण पूर येऊ शकतो. सविस्तर वाचा
Source link
नेपाळमध्ये अडकलेले विदर्भातील 110 पर्यटक सुरक्षित:प्रशासनाकडून परतीची व्यवस्था, 29 ऑगस्टला नागपुरात पोहोचणार